कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पासधारक विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना नव्याने देण्यात येणाऱ्या स्मार्टकार्डबाबत होत असलेल्या दिरंगाईबाबत व त्यामुळे होणाऱ्या त्रासाबाबत आमदार वैभव नाईक यांनी एसटी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
स्मार्ट कार्ड देण्याबाबत कोणत्याहीप्रकारे विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना त्रास होता कामा नये याची खबरदारी घ्या, असे खडे बोल त्यांनी सुनावले. तसेच आवश्यक असलेल्या गावात स्मार्ट कॅम्प घ्यावा, असाही त्यांनी सल्ला अधिकाऱ्यांना दिला.पासधारक विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रशासनाने आता स्मार्ट कार्ड सुरू केले असून या स्मार्ट कार्डची नोंदणी करण्यासाठी व कार्ड देण्यासाठी प्रत्येक बसस्थानकाच्या जवळ नोंदणी केंद्र सुरू केले आहे. या केंद्रावर विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज स्वीकारून त्यांना स्मार्ट कार्ड उपलब्ध करून देण्यात येत आहे.मात्र, कुडाळ एसटी प्रशासनाकडे स्मार्ट कार्ड योजना राबविण्यासाठी पुरेशी यंत्रणा नसल्यामुळे विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना दिवसभर ताटकळत उभे रहावे लागत आहे. याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून याबाबतच्या तक्रारी आमदार वैभव नाईक यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आमदार नाईक यांनी एसटी स्थानकाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या केंद्राची पाहणी शनिवारी केली.यावेळी जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, उपसभापती जयभारत पालव, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे, माजी उपसभापती बबन बोभाटे, माजी तालुकाप्रमुख संतोष शिरसाट, माजी पंचायत समिती सदस्य गंगाराम सडवेलकर, नगरसेवक सचिन काळप, युवासेनेचे सुशील चिंदरकर, पावशी ग्रामपंचायतीचे उपसरपंच दीपक आंगणे, नितीन सावंत, राजू जांभेकर, कुडाळ सुधार समितीचे अध्यक्ष प्रसाद शिरसाट, वसोली हायस्कूलचे मुख्याध्यापक अजित धुरी तसेच पालक, विद्यार्थी व शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कुडाळ तालुक्यात ४,१३९ स्मार्ट कार्डचे वितरणकुडाळ तालुक्यात सुमारे २ हजार ८४१ विद्यार्थी व ३ हजार ५६८ ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी स्मार्ट कार्डसाठी झाली आहे. यापैकी १ हजार ८६१ विद्यार्थी व २ हजार २७८ ज्येष्ठ नागरिकांना अशी एकूण ४,१३९ स्मार्ट कार्ड वितरित करण्यात आली आहेत.
अजूनही हजारो स्मार्ट कार्डचे वितरण करावयाचे आहे. मात्र, पुरेशा यंत्रणेअभावी स्मार्ट कार्ड देण्यास विलंब होत असून, याचा नाहक त्रास विद्यार्थी, पालक आणि ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागत आहे.