वैभववाडी : माजी महिला, बालकल्याण सभापती व भाजपच्या नेत्या स्नेहलता चोरगे यांच्या येथील घरावर अज्ञाताने दगडफेक केली. या दगडफेकीत त्यांच्या कारची समोरील काच फुटून नुकसान झाले आहे. बुधवारी मध्यरात्री १.३० च्या सुमारास ही घटना घडली. याबाबत चोरगे यांनी गुरुवारी सकाळी पोलिसांत तक्रार दिली. दरम्यान, चोरगे यांच्या घरावर दगडफेक झाल्याचे कळताच भाजप पदाधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन हल्लेखोरांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. स्नेहलता चोरगे यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर कॉँग्रेस पक्षाच्या नेतृत्वावर टीका करीत पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या कोकिसरे या मतदारसंघातून भाजपचे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले. परिणामी काँग्रेस पक्षाला संख्याबळाच्या गणितात तालुका पंचायत समितीची सत्ताही गमवावी लागली आहे. पोलिसांत दिलेली माहिती अशी की, बुधवारी रात्री तक्रारदार स्नेहलता चोरगे, पती, मुलगा अशी तिघे घरी होते. मध्यरात्री १.३० वाजता त्यांच्या घराला लागून असलेल्या कारशेडच्या पत्र्यावर काहीतरी पडल्याचा आवाज आला. त्यामुळे त्यांना जाग आली; परंतु रात्र असल्यामुळे तिघांपैकी कोणीच घराबाहेर पडले नाही. सकाळी उठल्यावर बाहेर पाहिले तेव्हा गॅलरीत मोठे दगड आढळून आले. त्यामुळे त्यांचे पती व मुलाने आजूबाजूला शोध घेतला असता शेडच्या पत्र्यासह गाडीवर दगड सापडले, तर गाडीची (एम.एच. ०९; सी. एम.- ६५५१) समोरील काच फुटल्याचे निदर्शनास आले. शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद स्नेहलता चोरगे यांनी दिलेल्या तक्रारनुसार पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पोलिस उपनिरीक्षक एस. एस. तळेकर या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच भाजप जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे, अतुल रावराणे, सज्जन रावराणे आदींनी पोलिस ठाण्यात धाव घेत शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून हल्लेखोरावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली; परंतु शहरातील तिन्ही सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर बँक आॅफ इंडियाच्या सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांनी तपासले. मात्र, त्या कॅमेऱ्याच्या कक्षेत रस्त्यावरील वर्दळ येत नसल्याने दगडफेक करणाऱ्यांबाबत पोलिसांच्या हाती धागेदोरे लागू शकलेले नाहीत. (प्रतिनिधी) अतिरिक्त पोलिस अधीक्षकांची वैभववाडीला भेट स्नेहलता चोरगे यांच्या घरावर झालेल्या दगडफेकीची जिल्हा पोलिस प्रशासनाने दखल घेतली असून या पार्श्वभूमीवर सायंकाळी उशिरा अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांनी वैभववाडीला भेट दिली. दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत दिवसभरातील तपासाचा आढावा घेत त्यांनी स्नेहलता चोरगे यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी ‘म्हातारी मेल्याचे दु:ख नाही; पण काळ सोकावता कामा नये’ अशा शब्दांत गुन्ह्याचा छडा लावण्याची मागणी चोरगेंनी केली. त्यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना, तक्रारीत कुणावरही संशय व्यक्त करण्यात आलेला नाही. योग्य तऱ्हेने तपास केला जाईल, असे प्रकाश गायकवाड यांनी सांगितले.
स्नेहलता चोरगेंच्या घरावर दगडफेक
By admin | Published: March 16, 2017 11:28 PM