..म्हणून काँग्रेसकडून लोकसभेसाठी स्वबळावर लढण्याचा सर्व्हे - नितेश राणे
By सुधीर राणे | Published: January 5, 2024 06:40 PM2024-01-05T18:40:43+5:302024-01-05T18:41:20+5:30
..त्यासाठीच प्रंतप्रधान मोदींना टार्गेट
कणकवली: ठाकरे सेना आपल्या पक्षामध्ये विलीन करावा असा प्रस्ताव काँग्रेसच्या वरिष्ठांनी दिला आहे. त्यामुळे काँग्रेसने ठाकरे सेना संपविण्याचा घाट घातला आहे. असा खळबळजनक आरोप करतानाच, त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील लोकसभेच्या ४८ जागा काँग्रेस पक्ष स्वबळावर लढण्याचा सर्व्हे करत आहे. असे आमदार नितेश राणे यांनी येथे सांगितले.
कणकवली येथे शुक्रवारी प्रसिद्धी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, अदानी समूहाबाबत सर्वोच्च न्यायालयाने अतिशय महत्वाचा निकाल दिला आहे. त्यांच्या उद्योगामुळे आपला देश प्रगती पथावर आहे. असे असताना विरोधक हिंडनबर्ग रिपोर्टच्या नावाखाली देशाची बदनामी करत होते. तो प्रकार न्यायालयाने हाणून पाडला आहे. त्यामुळे मिर्ची झोंबल्याने आणि १० जनपथची मर्जी सांभाळण्यासाठी संजय राऊत यांनी गरळ ओकली आहे. मात्र, त्यांचे महागुरू शरद पवार हे अदानींना का भेटतात? हे प्रथम संजय राऊत यांनी जाणून घ्यावे. अदानीवर बोलण्यापूर्वी सिल्वर ओकमध्ये अदानीबाबत काय मत आहे, हे विचारून नंतरच बोलावे, असा सल्ला आमदार नितेश राणे यांनी दिला.
त्यासाठीच प्रंतप्रधान मोदींना टार्गेट
काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांना देशातील सनातन हिंदू धर्म संपवायचा आहे. त्यासाठीच प्रंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट केले जात आहे. मात्र त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी ते यात यशस्वी होणार नाहीत. सातत्याने संजय राऊत न्यायालयाचा अपमान करत आहेत. त्यामुळे राऊत यांच्यावर 'सुमोटो' कारवाई न्यायालयाने करून त्यांना अटक करावी. प्रभू श्री राम यांचा अपमान झाल्यानंतर तो कुठलाही हिंदू सहन करणार नाही. जितेंद्र आव्हाड हे पाकिस्तानमध्ये राहत नाहीत. भारतातच राहतात, त्यामुळे त्यांनी बोलताना दक्षता घ्यायला हवी असेही राणे म्हणाले.