ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत ४७ हजार ९७५ एवढे लसीचे डोस देण्यात आले आहेत. यात ४१ हजार १७८ जणांना पहिला, तर सहा हजार ७९७ जणांना दोन डोस देण्यात आला आहे. यात २८ हजार १७७ एवढ्या ज्येष्ठ नागरिकांनी ही लस घेतली आहे.
जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर आरटीपीसीआर तपासणी केली जात असून, जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. तसेच तपासणीला न घाबरता रुग्णांनी कोरोना तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला १६ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. जिल्ह्याला ५८ हजार ७६० एवढे कोरोना लसीचे डोस प्राप्त झाले होते. एका व्यक्तीला दोन डोस द्यायचे असल्याने त्यानुसार आरोग्य विभागाने लसीकरणाचे नियोजन केले होते. त्यानुसार आतापर्यंत ४७ हजार ९७५ एवढे डोस देण्यात आले आहेत. यात ४१ हजार १७८ व्यक्तींना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, तर ६ हजार ७९७ व्यक्तींनी लसीचे दोन्ही डोस पूर्ण केले आहेत.
लसीकरणमध्ये १३ हजार ९६८ आरोग्य कर्मचारी, ५ हजार ८३० फ्रंट लाईन वर्कर्स यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात आतापर्यंत ६० वर्षांवरील २८ हजार १७७ व्यक्तींनी ही लस घेतली आहे. अजून १० हजार ७७५ एवढे डोस शिल्लक असून, आणखी लस लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.अधिकाऱ्यांची मुंबई वारी थांबवावीमुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरांतून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांची आरटीपीसीआर तपासणी करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. मात्र, अनेक अधिकाऱ्यांना विविध बैठकांसाठी मुंबईला जावे लागते. हे अधिकारी मुंबईला जाऊन पुन्हा जिल्ह्यात येतात. अशांतून त्यांना कोरोनाची लागण होण्याची व त्यांच्यापासून इतर कर्मचाऱ्यांना लागण होण्याची शक्यता जास्त असल्याने शासनाने अधिकाऱ्यांची मुंबई वारी कमी करून ऑनलाईन बैठका आयोजित कराव्यात, अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून केली जात आहे.प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर तपासणीजिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनाची आरटीपीसीआर तपासणी केली जात आहे. त्याचप्रमाणे कोरोनाच्या रुग्णांचे लवकरात लवकर ट्रेसिंग होऊन त्यांना उपचाराखाली आणण्यासाठी जिल्ह्यात जिल्हा, तालुका व पीएचसी स्तरावर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांमार्फत रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या कोरोनाच्या तपासण्या वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात रुग्ण सापडण्याच्या संख्येत वाढ होत आहे. हे सर्व रुग्ण स्थानिक असल्याचे डॉ. संदेश कांबळे यांनी सांगितले.