कणकवली :- राज्यात शिवसेना आणि भाजपची युती झालेली आहे. त्यामुळे युतीच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंनी सभा घेतली आणि त्यात बोलावणं आलं तर तेथे जाऊन शिवसेना उमेदवाराचा प्रचार करायलाही आम्ही तयार आहोत. त्याच धर्तीवर शिवसेनेने देखील युतीचा धर्म पाळावा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी येथे केले. कणकवलीमतदारसंघात आमदार नितेश राणे यांच्याविरोधात शिवसेना आपला उमेदवार उभा करणार नाही. तसे केल्यास राज्यातील युती भंग होऊ शकते, असेही ते म्हणाले. येथील भाजप कार्यालयात नारायण राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे राज्य उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. आमदार नितेश राणे हे आता भाजपचे तथा युतीचे उमेदवार आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गसह राज्यात इतर ठिकाणी शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी तुम्ही जाणार का ? असा प्रश्न श्री राणे यांना विचारला असता, युतीचा धर्म पाळावा लागेल. जर शिवसेनेकडून बोलावणे आले तर उद्धव ठाकरे यांच्या सभेत जाऊनही आम्ही प्रचार करायला तयार आहोत. मात्र बोलावणं यायला हवं. तसंच कणकवलीत भाजपचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारातही शिवसेनेने सहभागी व्हायला हवे.युतीचा धर्म त्यांनी पाळायला हवा, असे राणे म्हणाले. स्वाभिमान पक्षाचे भाजपात विलीनीकरण केव्हा होईल या प्रश्नावर बोलताना राणे म्हणाले, स्वाभिमान पक्षाचे विलीनीकरण टप्याटप्याने होणार आहे. ज्यावेळी मुख्यमंत्र्यांना वेळ मिळेल त्यावेळी मोठ्या दिमाखात हा विलीनीकरण सोहळा होईल. नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत आपण नंतर बोलू, असेही राणे म्हणाले.
Maharashtra Election 2019 : ...तर मी शिवसेनेचा प्रचारही करायला तयार- नारायण राणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 16:26 IST