सावंतवाडी : ज्याच्या बद्दल तक्रारी असतील पुरावे असतील त्यांची चौकशी होते. मात्र, आपण काही केले नाही तर घाबरण्याचे कारण काय? कोणतीही एजन्सी कोणावर थेट कारवाई करू शकत नाही. भाजपने कोणत्याही चौकशी संस्थेचा गैरवापर केला नाही. काँग्रेसच्या काळातच तो अधिकचा झाला आहे, अशी टिका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली ते सावंतवाडी येथे बोलत होते.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सोमवारी कोल्हापूरहून आंबोलीमार्गे गोव्याला खाजगी दैऱ्यानिमित्त जात असताना काही काळ सावंतवाडी येथे थांबले होते. त्यावेळी त्यांचे भाजपच्यावतीने जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार रविंद्र चव्हाण,नितेश राणे,जिल्हाध्यक्ष राजन तेली, नगराध्यक्ष संजू परब,अतुल काळसेकर,मनोज नाईक,उपसभापती शितल राउळ,परिमल नाईक,प्रभाकर सावंत,आनंद नेवगी,सुधीर आडिवरेकर,अमित परब, आनंद सावंत, राजू राउळ ,दिलीप भालेकर, मोहिनी मडगावकर,समृध्दी विनोडकर, उत्कर्षा सासोलकर ,दिप्ती माटेकर आदि उपस्थीत होते.
फडणवीस म्हणाले, बांधकाम क्षेत्राबाबत राज्य सरकारने घेतलेला निर्णय हा चुकीचा आहे. यातील घोटाळे मी स्वता उघडकीस आणले आहेत. त्याची चौकशी करा अन्यथा मला उच्च न्यायालयात जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच कोकणातील शेतकऱ्यांना सरकारने कोणतीही मदत केली नाही. मी अनेकांशी बोललो आहे, त्यांनीही अशी कोणतीही मदत आली नसल्याचे सांगितले. काँग्रेसने ईडीचे व भाजप कार्यालये एकत्र केली पाहिजेत, अशी टिका केली होती. त्यावर फडणवीस यांनी खुलासा केला. काँग्रेसच्या काळात सर्वात जास्त चौकशी एजन्सीचा गैरवापर झाला होता. त्यामुळे ते आता भाजपवर आरोप करत आहेत. मात्र ज्याची चौकशी होणार आहेत, त्याबाबतचे पुरावे असतील, तक्रारी असतील तर चौकशी होते. जर आपण काहीच केले नाही तर घाबरण्याचे कारण काय?असा सवाल फडणवीस यांनी केला. तसेच दोषी नसतील तर कोणतीही एजन्सी कोणावर थेट कारवाई करू शकत नाही, असेही त्यांनी म्हटले.