रजनीकांत कदम -- कुडाळ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सिंधुदुर्गनगरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असलेल्या सामाजिक न्यायभवनाला गेले कित्येक महिने लावण्यात आलेला फलक कोराच ठेवण्यात आला आहे. किरकोळ खर्चाच्या या गोष्टीला प्रशासनेही बगल दिली असल्याने प्रशासन नेमका कोणता हेतू यातून साध्य करत आहे, असा सवाल निर्माण झाला आहे. तर या गोष्टीकडे समाज कल्याण सभापतींनीही केलेले दुर्लक्षही चर्चेचा विषय बनले आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सामाजिक न्यायभवन बांधण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हे सामाजिक न्याय भवन उभारण्यात आले आहे. या सामाजिक न्यायभवनाला बांधल्यानंतर गेली कित्येक वर्षे झाली. तसेच यामध्ये विविध कार्यालये, कार्यक्रम सुरू झाले. लोकांची, अधिकाऱ्यांची वर्दळ सुरू झाली. असे असतानाही या सामाजिक न्याय भवन इमारतीचा नावाचा फलकच नाही. सर्व जिल्ह्यासह राज्यातील सर्वच ठिकाणी सामाजिक न्याय भवनाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले आहे. त्यामुळ डॉ. आंबेडकरांची जाण व त्यांना देण्यात येणारा मानही यातून प्रकट करण्याचा प्रशासनाचा प्रामाणिक प्रयत्न असतो. शिवाय भारतील राज्यघटनेचे शिल्पकार असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले सामाजिक न्यायाच्या कामालाही उपकृत करण्यासाठी हा उपक्रम शासनाने राबविला आहे. पण सिंधुदूर्गनगरीत मात्र सामाजिक न्याय भवनाला मात्र अजूनही या नामफलकाचा मुहूर्त सापडत नाही. कार्यालयावर लावण्यात आलेला फलक हा कित्येक दिवस कोराच ठेवण्यात आल्याने प्रशासनाने यागोष्टीला नेमकी का बगल दिली आहे, हे न समजणारे कोडे आहे. खर्चाचा विषय आला तर केवळ शंभराच्या पटीत हा खर्च येऊ शकतो पण तरीही प्रशासन याला बगल देऊन नेमके काय साध्य करत आहे, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. या इमारतीत कार्यरत असणाऱ्या कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्यांच्या ही बाब ध्यानात आली नाही. यामागे अधिकाऱ्यांचा काय उद्देश आहे, असा प्रश्न येथील जनतेला पडला आहे.या इमारतीवर फलक लावण्याचा खर्च हा जेमतेम असू शकतो. मात्र, ‘सरकारी काम सहा महिने थांब’ अशा पध्दतीने या इमारतीला कधी फलक लागेल, हे सांगता येत नाही. मात्र, अजून का काही दिवस वाट बघून येथील बाबासाहेबांचे अनुयायी या इमारतीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सिंधुदुर्ग असा फलक लावतील, हे मात्र नक्की.
सामाजिक न्याय भवनाची पाटी कोरीच
By admin | Published: January 23, 2016 12:12 AM