बांदा : संत तुकोबांची निस्पृहता, संत एकनाथांची निर्वेरता व संत ज्ञानोबा माऊलींचा अमृतानुभव या तिन्हींचा संगम संत सोहिरोबानाथांमध्ये पाहण्यास मिळतो. आपल्याला कितीही ज्ञान मिळाले तरी हरी म्हणजे परमात्म्याविना ते व्यर्थ आहे. याच हरीच्या भजनावीणा काळ घालवू नको रे, असा संदेश नाथांनी दिला आहे. अनुभव म्हणजे प्रचिती आल्याशिवाय मान डोलावू नको, असा उपदेश करणाऱ्या संत सोहिरोबानाथांचे साहित्य हे प्रत्यक्ष आत्म अनुभवातून साकारलेले लेखन आहे, असे प्रतिपादन पर्वरी- गोवा येथील व्याख्याते गोविंदराव काळे यांनी बांदा येथे केले.संत सोहिरोबानाथ आंबिये यांच्या जन्मत्रिशताब्दी समारोप सोहळ्यानिमित्त बांदा येथे २१ ते २८ मार्च या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात रविवारी आयोजित केलेल्या आध्यात्मिक व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, आज विज्ञान तसेच इंग्रजी शिक्षण हे आवश्यक व उपयुक्त असले तरीही संस्कार, सद्विवेक आणि संतांचे उपदेश हे कधीच विसरता कामा नये. परमार्थ आपल्याला जीवन जगण्यास शिकवितो. जीवनाच्या कल्याणासाठी संतांना शरण जाणे आवश्यक आहे. संत परंपरा भोगाचा नव्हे, तर मुक्तीचा मार्ग दाखविते. संत एखाद्या नावाड्याप्रमाणे स्वत: भवसागरात तरतात व इतरांनांही तारतात.या समारोप सोहळ्याचे उद्घाटन काळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने संपन्न झाले. याप्रसंगी उपसरपंच बाळा आकेरकर, व्यापारी संघाचे अध्यक्ष दत्तप्रसाद पावसकर, सचिव सचिन नाटेकर, संत सोहिरोबानाथ जन्मत्रिशताब्दी समितीचे अध्यक्ष सावळाराम सावंत, उपाध्यक्ष गिरीष महाजन, सचिव प्रकाश मिशाळ, अॅड. रामनाथ आंबिये, प्रसाद आंबिये, विवेक आंबिये, दिवाकर नाटेकर, गुरुनाथ सावंत, आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस. आर. सावंत यांनी केले, तर सूत्रसंचालन आशुतोष भांगले यांनी करून आभार मानले. या व्याख्यानासाठी संतप्रेमी श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सोहिरोबांचे साहित्य आत्मानुभवातून साकारलेले
By admin | Published: March 23, 2015 9:07 PM