शिवाजी गोरे ल्ल दापोलीभविष्यात देशातील विजेची वाढती समस्या लक्षात घेऊन भारत सरकारने जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सोलर मिशनच्या माध्यमातून सरकारी कार्यालये सोलर ऊर्जेशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या माध्यमातून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ हे सोलर ऊर्जा बसविणारे राज्यातील पहिले विद्यापीठ ठरणार आहे. पर्यावरणपूरक वीज वापरून निसर्गाची हानी टाळता यावी, नैसर्गिक ऊर्जेचा वापर करून वीज बचत व्हावी, यादृष्टीने सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले असून, कोकण कृषी विद्यापीठानेही एक पाऊल पुढे टाकत सोलर ऊर्जा बसविण्याचा निर्णय घेतला आहे.डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला दरवर्षी सात ते आठ लाख युनिट विजेची गरज आहे. महावितरण कंपनीच्या युनिटचा दर प्रतियुनिट नऊ ते दहा रुपये आहे; परंतु सोलर युनिट बसविल्यास यातून विद्यापीठाला पाच लाख ३५ हजार युनिट वीज मिळणार असून, त्याचा दर प्रतियुनिट पाच रुपये ५९ पैसे एवढा असणार आहे. यातून महावितरण कंपनीपेक्षा तीन रुपये प्रतियुनिट दर कमी होणार असून, विद्यापीठाच्या वीज बिलात वर्षाला सुमारे २० ते २५ लाख रुपयांची बचत होणार आहे.सोलर ऊर्जा बसविण्याबाबत केंद्र सरकारने नेमलेल्या डेव्हलपरशी कोकण कृषी विद्यापीठाचा २५ वर्षांचा करार झालाअसून, २५ वर्षे या प्रोजेक्टच्या देखभालीची (मेंटेनन्स) जबाबदारी ही संबंधित कंपनीची राहणार आहे. २५ वर्षांत विद्यापीठाला एक नया पैसा यासाठी खर्च करावा लागणार नाही. या प्रकल्पासाठी सुमारे दोन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यासाठीचा निधी हा डेव्हलपरला थेट केंद्र सरकारकडून मिळणार आहे. त्यामुळे निधीचा अभाव किंवा टेंडर प्रक्रिया या गोष्टींची जबाबदारी विद्यापीठाची राहणार नाही.दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठाच्या सहा इमारतींवर ही सोलर पॅनल बसविण्यात येणार असून, यातून निर्माण झालेली वीज ही एमएसईबीच्या ग्रीडमधून देण्यात येणार आहे. ‘नेट मीटर मॅकॅनिझम युनिट’द्वारे या विजेचे मोजमाप करता येणार आहे.एमएसईबीच्या ग्रीडमधून ही वीज देण्यात येणार असल्याने बॅटरीचा कोणताही खर्च येणार नाही. तसेच मेंटेनन्सचा खर्चसुद्धा कमी येणार आहे. कुलगुरू इमारत, कृषी महाविद्यालय, वनशास्त्र वसतिगृह, जयप्रभा वसतिगृह, किसान भवन या पाच इमारतींसाठी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इमारतीवरील चार हजार ३९६ स्क्वेअर फूट जागेत ही सोलर पॅनल बसवून याठिकाणी वीजनिर्मिती केली जाणार आहे.चौकटआर्थिक भार नाहीचसोलर एनर्जीकरिता कृषी विद्यापीठाला कोणताही आर्थिक भार उचलावा लागणार नसून, केंद्र सरकारने नेमलेल्या अधिकृत डेव्हलपरकडून हा खर्च केला जाणार आहे. आगामी चार महिन्यांत या सोलर ऊर्जा प्रकल्पाचे काम पूर्ण होणार असून, एप्रिल किंवा मे महिन्यापर्यंत कोकण कृषी विद्यापीठ हे सोरल ऊर्जा वापरणारे राज्यातील पहिले विद्यापीठ ठरणार आहे. सोलर ऊर्जा प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.दोन वेगवेगळे मीटर सोलर ऊर्जेतून निर्माण होणाऱ्या विजेचा पुरवठा हा एमएसईबीच्या ग्रीडमधून केला जाणार आहे. तसेच महावितरण कंपनीची किती वीज वापरली गेली व सोलर ऊर्जेतून किती वीज वापरली गेली हे दोन्ही मीटर रिडिंगवरून लक्षात येणार आहे. दो न्ही वीज बिलांसाठी दोन वेगवेगळे मीटर असणार आहेत. त्याचबरोबर दोन्ही मीटरद्वारे वापरल्या गेलेल्या विजेची माहितीही एकत्रितपणे ‘डिसप्ले बोर्ड’वर दाखविली जाणार आहे.
राज्यातील पहिले कृषी विद्यापीठ सोलर ऊर्जेवर
By admin | Published: January 27, 2017 11:15 PM