मालवण : सागरी पर्यटन हंगामाचा रविवार १ सप्टेंबरपासून श्रीगणेशा होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन सूरज नाईक यांनी मालवण येथील बंदरातील ६३ जलप्रवासी वाहतूक नौकाधारकांना प्रवासी वाहतुकीचे परवाने वितरीत केले. येत्या वर्षभरात आणखी १०० ते १५० अधिकृत जलप्रवासी वाहतूक परवाने काढले जावेत यादृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत, असे नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले.दरम्यान, किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष मंगेश सावंत यांनी आतापर्यत सागरी पर्यटन हंगामाच्या सुरूवातीस प्रवासी होडी वाहतूक व्यावसायिकांना एकदाही परवाना मिळाला नव्हता. मात्र, यावर्षी हंगाम सुरू होण्याच्या आदल्या दिवशी प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन सूरज नाईक यांच्या माध्यमातून जलप्रवासी नौकांना परवाना प्राप्त झाल्याने प्रवासी होडी नौकाधारकांच्यावतीने आम्ही त्यांचे आभारी आहोत, असे सांगितले.परवाना वितरण कार्यक्रमास बंदर निरीक्षक सुषमा कुमठेकर, होडी प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष मंगेश सावंत, दिलीप आचरेकर, बाबा सरकारे, राजू पराडकर, दादा जोशी, स्वप्नील आचरेकर, आप्पा मोरजकर, बाळा तारी, विनायक तारी, काका जोशी, प्रसाद सरकारे, कर्मचारी शंकर नार्वेकर, एस. आर. मिठबावकर, एस. एच. कदम, ए. एस. गावकर आदी उपस्थित होते.कॅप्टन नाईक म्हणाले, तालुक्यातील सर्व जलक्रीडा, जलप्रवासी वाहतूक नौकाधारक, स्कूबा डायव्हिंग व्यावसायिकांची बैठक २० जूनला घेण्यात आली होती. या बैठकीत जलप्रवासी आयव्ही अॅक्ट १९१७ अंतर्गत नियमित करून अनधिकृत जलप्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद करण्याची सूचना सर्वांना देण्यात आली होती.
सन २०१७-१८ मध्ये तालुक्यात केवळ पाच प्रवासी वाहतूक परवाने देण्यात आले होते. त्यामुळे सर्वांना आयव्ही अॅॅक्टअंतर्गत नौका वाहतूक करण्यासाठी नौकांची असणारी कार्यवाही समजावून सांगण्यात आली होती. त्यानुसार येथील जलप्रवासी नौकाधारकांनी परवान्यासाठी ६३ प्रस्ताव सादर केले.