देवरूख : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजींच्या वास्तव्याने पावन झालेल्या गोळवलीचा सर्वांगिण विकास हे आमचे कर्तव्य आहे. ग्रामपंचायतीच्या हीरकङ्कमहोत्सवापूर्वी पुढील वर्षीपर्यंत गावातील सर्व समस्या मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन केंद्रीय ऊर्जा राज्यमंंत्री पियुष गोयल यांनी दिले.सांसद दत्तक ग्रामयोजनेंतर्गत गोयल यांनी गोळवली हे गाव दत्तक घेतले आहे. योजनेच्या पुढील कार्यवाहीसाठी आणि ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी गोयल संगमेश्वरात आले होते. कार्यक्रमाआधी त्यांनी ग्रामस्थांसह गावात फेरफटका मारला. गाव स्वच्छ ठेवून येथील ग्रामस्थांनी नवा आदर्श निर्र्माण केला आहे. पुढच्या वर्षी ग्रामपंचायतीचा हीरक महोत्सव साजरा होणार आहे. त्यापूर्वी गावात नवे ग्रंथालय, ग्रामस्थांनी मागणी केलेला पूल, बारमाही एस. टी.ची सेवा, गावातील प्रत्येक शाळा संगणकीकृत करणे, गावातील वाडीवार कचरा कुंडी या समस्या प्राधान्याने सोडवण्यात येतील. ग्रामस्थांनी स्मशानभूमीची मागणी केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, ही स्मशानभूमी सर्वधर्मीयांसाठी एकत्र करण्यात येणार असून, अखंड देशात अशी स्मशानभूमी कुठेच सापडणार नाही, असा दावा त्यांनी केला. केंद्राच्या सर्व योजना गावात राबवण्यास कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.शासनाच्या शेतीविषयक योजना राबवून शेती विकासासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी जाहीर केले. गावात सेमी इंग्लिश शाळा सुरू करा, यातून विद्यार्थ्यांची प्रगती होईल, असा विश्वास जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश शेवडे यांनी व्यक्त केला. गावातील प्रत्येक ग्रामस्थाने एक तरी गाय पाळली पाहिजे, गोमुत्राचा उपयोग उत्तम शेती होण्यास होतो, आज अनेक शेतकरी सेंद्रीय शेतीचे प्रयोग यशस्वी करताना दिसत आहेत. दूध, दुग्धजन्य पदार्थ, गोमूत्र आणि शेण अशा बहुपयोग असणाऱ्या गोमातेचे संवर्धन आणि गोवंशाचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे, असे गोळवलकर गुरूजी प्रकल्प संचालक चंद्रशेखर देशपांडे यांनी स्पष्ट केले.या कार्यक्रमापूर्वी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी पदाधिकारी आणि ग्रामस्थांची एकत्रित बैठक घेतली. या बैठकीत ग्रामस्थांनी पाण्याचा प्रश्न, दुदमवाडीतील पाणीटंचाई, धरणाची आवश्यकता, नवीन नळपाणी योजना, गावातील सर्व रस्ते, रास्तदराच्या धान्य दुकानात नियमित धान्य पुरवठा, सार्वजनिक ठिकाणी शौचालये अशा विविध मागण्या केल्या.या कार्यक्रमांतर्गत शासनाकडील विविध योजनांमधून मिळालेल्या भेटवस्तूंचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., सरपंच संतोष गमरे, पंचायत समितीचे उपसभापती संतोष डावल, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश शेवडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रायकर, पोलीसपाटील अप्पा पाध्ये यांच्यासह ग्रामस्थ तसेच अधिकारी व राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
हीरक महोत्सवापूर्वी सर्व समस्या सोडवणार
By admin | Published: June 07, 2015 11:59 PM