सावंतवाडी : वेर्ले येथील शौचालय घोटाळ््याप्रकरणी पोलिसांनी ग्रामसेवक केतन जाधवला ताब्यात घेतले आहे. त्यामुळे या अपहार प्रकरणात आणखी काहींचा समावेश उघड होणार आहे. जाधवला अटक केल्यानंतर येथील न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी यापूर्वीच अपहारप्रकरणी सरपंच प्रमिला मेस्त्री हिला अटक केली होती. वेर्ले येथे ३५ लाखांचा शौचालय घोटाळा झाला आहे. याप्रकरणी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुमित यरवलकर यांनी येथील पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहाराचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, ग्रामसेवक केतन जाधव हा बरेच दिवस पसार होता. पोलिस त्याचा शोध घेत होते. मात्र, तो पोलिसांना सापडत नव्हता. अलीकडेच त्याने जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. जिल्हा सत्रन्यायालयाने ग्रामसेवक जाधवचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर ग्रामसेवक जाधव हा येथील पोलिस ठाण्यात मंगळवारी हजर झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, ग्रामसेवक केतन जाधवच्या अटकेमुळे अपहार प्रकरणात आणखी कोणाकोणाचा समावेश आहे, हे समजणार आहे. (प्रतिनिधी) सरपंच मेस्त्रीच्या कोऱ्या धनादेशावर सह्या सरपंच प्रमिला मेस्त्री हिला अटक केल्यानंतर अनेक बाबी उघड झाल्या आहेत. यात प्रामुख्याने सरपंच मेस्त्रीच्या कोऱ्या धनादेशावर सह्या घेण्यात आल्या होत्या. यात ग्रामसेवकाचा हात असल्याचे प्रामुख्याने आढळून आले. मात्र, ग्रामसेवकाला मदत करणारे अद्याप बाहेर आहेत. त्यांचीही पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
वेर्ले अपहार प्रकरणात आणखी काही बडे लोक
By admin | Published: October 26, 2016 11:08 PM