कुडाळ : तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे भंगसाळ, निर्मला, हातेरी या नद्यांना पूर आल्याने तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली. भंगसाळ नदीच्या पुरामुळे शहरातील अनेक भागात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. आंबेरी पुलावर व कुडाळ शहरातील रस्त्यावर पाणी आल्याने येथील वाहतूक ठप्प होती. भंगसाळ नदीच्या पुराचे पाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथील काही घरांपर्यंत आल्यामुळे येथील काही कुटुंबीयांना स्थलांतरित व्हावे लागण्याची शक्यता आहे.कुडाळ शहरात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत असून कुडाळ तालुक्यातील नदी-नाल्यांना पूर आला आहे. कुडाळ तालुक्यातील भंगसाळ नदीने तर धोक्याची पातळी ओलांडली असून पुराचे पाणी नदीकिनारी कुडाळ, पावशी, सरंबळ तसेच इतर गावातील परिसरात पसरण्यास सुरुवात झाली आहे.
असाच पाऊस पडत राहिला तर या पुराचे पाणी अनेकांच्या घरात जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान व धोका होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. आंबेरी येथील पुलावर नदीचे पाणी आल्याने येथील वाहतूक काही काळ ठप्प होती. तर पणदूर येथील सातेरी नदीलाही पूरस्थिती निर्माण झाली होती.भंगसाळ नदीचे पात्र इतके दुथडी भरून वाहत आहे की, महामार्ग चौपदरीकरणावेळी नव्याने उंच बांधण्यात आलेल्या पुलाच्या काही फूटच अंतर टेकण्यासाठी हे पाणी राहिले होते. त्यामुळे भंगसाळ नदीला आलेल्या पुराची प्रचिती दिसून येत होती.