सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ लवकरच सुरू होईल. मात्र त्याच्या काही परवानग्या घेणे बाकी आहे. अद्याप केंद्रीय गृहखात्यांची परवानगी मिळणे बाकी असल्याची कबुली केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी रविवारी दिली. या परवानग्या विमानतळ बांधणा-या कंपनीने घेणे आवश्यक होते. ते काम आता मलाच करावे लागत आहे. या परवानग्या लवकर घेतल्या जात असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी आणि रत्नागिरी विमानतळाचा समावेश उड्डाण तीनमध्ये करण्यात आला असल्याचे यावेळी मंत्री प्रभू यांनी स्पष्ट केले.कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी येथे बांधण्यात येत असलेल्या रेल टेल हॉटेलच्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता आदी उपस्थित होते. यावेळी मंत्री प्रभू म्हणाले, जगात अर्थव्यवस्थेचे समीकरण बदलले आहे. त्यामुळे आता निरनिराळ्या नोक-या उपलब्ध होत आहेत. ‘स्टार्टअप इंडिया’सारखे नवनवीन प्रकल्प येत आहेत. त्यातूनही रोजगाराच्या संधी येत आहेत. पूर्वी रोजगाराबाबत वेगळे समीकरण होते. पण आता हे समीकरण बदलले आहे. पर्यटन तसेच सेवाक्षेत्र या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार येत आहेत. हे बदलते स्वरूप आहेत. ते आता सर्वांनी स्वीकारले पाहिजे. हे स्वरूप भारतातच नाही, तर जगात बदलले आहे, असेही मंत्री प्रभू यांनी सांगितले.सिंधुदुर्गमधील चिपी व रत्नागिरी विमानतळाचा समावेश हा उड्डाण तीनमध्ये करण्यात आला आहे. उड्डाण तीनचा शुभारंभ ८ फेबु्रवारीला होणार आहे. यावेळी या दोन विमानतळांसाठी विमान कंपन्यांची बोली लागेल आणि नंतरच हे विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू होईल. मात्र चिपी विमानतळाच्या काही परवानग्या येणे बाकी आहेत. गृहविभागाची परवानगी अद्याप मिळाली नाही. ती घेण्याचे काम विमानतळ तयार करणाºया कंपनीचे होते, पण तेही काम आता मलाच करावे लागत आहे. तेही काम करू आणि लवकरात लवकर हे विमानतळ सुरू केले जाईल, असे यावेळी मंत्री प्रभू यांनी स्पष्ट केले.
चिपी विमानतळाच्या काही परवानग्या बाकी, सुरेश प्रभूंची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 9:08 AM