सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर गोव्याच्या हद्दीतील पेडणे तालुक्यात मोठ्याप्रमाणात वेगवेगळे प्रकल्प येत असून या प्रकल्पातून रोजगारही बराच मोठा उभा राहणार आहे.पण या रोजगाराची संधी गोव्यातील युवकाप्रामणेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांना मिळावी म्हणून गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला असून गोवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांसाठी रोजगार परिषद घेण्यात येणार आहे.तसेच सुतोवाच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्यातील एका खाजगी कार्यक्रमात सावंतवाडीतील पत्रकारांशी बोलताना केले.
यावेळी गोव्याचे प्रदेशाध्यक्ष सदानंदशेठ तानवडे,आमदार चंद्रकांत शेटये,माजी आमदार राजन तेली,आनंद नेवगी आदि उपस्थित होते.मुख्यमंत्री सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली त्यात प्रामुख्याने रोजगार या विषयावर त्यांनी भर दिला.गोव्यात मोठ्याप्रमाणात प्रकल्प येत आहेत त्यात रोजगार उपलब्ध होणार आहे.त्यासाठी माजी आमदार राजन तेली यांना पुढाकार घेण्यास सांगत मुख्यमंत्री सावंत यांनी गोव्यातील व सिंधुदुर्ग युवकाना घेऊन एक रोजगार परिषद भरवूया रोजगाराचा मोठा प्रश्न सपेल असे मत त्यांनी व्यक्त केले.याला गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंदशेठ तानावडे यांनीही दुजोरा देत सर्वानी मिळून प्रयत्न करूया असे सांगितले.
तसेच गोवा-बांबुळी येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना मिळणाऱ्या सेवेबाबत सावंत यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना आम्ही चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र विमा योजना व अन्य काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे काही रुग्णांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे.
मात्र यावर सुद्धा काहीतरी तोडगा काढला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.गोव्यातील पर्यटकांच्या गाड्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात जात असतील तर त्यांना वेगळा टॅक्स आकारण्यात येतो तो कशा पध्दतीने आकारण्यात येतो त्याची मी माहिती घेतो आणि योग्य तो निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.