देवगड : समुद्रात दक्षिणेचा वारा सुरू झाल्यामुळे समुद्र खवळला असून ७ सप्टेंबरपर्यंत मच्छिमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आल्याने आश्रयासाठी गुजरातमधील नौका सुरक्षित असलेल्या देवगड बंदरात दाखल होत आहेत.
कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने व ताशी ५० ते ५५ किमी वेगाने वारे वाहत असल्याने वादळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे समुद्र खवळला असून १ ते ७ सप्टेंबरपर्यंत मच्छिमारांनी समुद्रात मच्छिमारीसाठी जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. यामुळे खोल समुद्रात मच्छिमारी करीत असलेल्या गुजरात राज्यातील नौका जवळच असलेल्या व सुरक्षित बंदर म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवगड बंदरात आश्रयासाठी रविवारी सायंकाळपासून दाखल होत आहे.
मच्छिमारी हंगाम सुरू झाल्यानंतर एक महिना झाला. मात्र नौकांसाठी हा कालावधी असफल ठरला. देवगड बंदरात काही नौकामालकांनी नौका लोटून मच्छिमारीसाठी पाठविल्या. मात्र हंगामाच्या पहिल्याच महिन्यात नौकामालकांच्या पदरी निराशा आली. नौकांना निपल म्हाकुल मिळत होती. मात्र या मासळीमध्ये नौकामालकांचा डिझेलचा खर्चही भागत नसल्याने काहींनी नौका बंद अवस्थेत ठेवल्या. यामुळे देवगडमधील मच्छिमारीही ठप्प झाली होती.
मात्र, इतर राज्यातील नौका खोल समुद्रात मच्छिमारी करीत असून सध्या बिघडलेल्या वातावरणामुळे नौकांनी देवगड बंदराचा आश्रय घेतला आहे. गणेशाच्या आगमनाच्या मुहूर्तावरच पावसानेही पुन्हा हजेरी लावली असून वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आल्याने मच्छिमारांनी व्यवसाय बंद ठेवला आहे.