सावंतवाडी : पर्ससीन व मिनी पर्ससीननेट यांच्यातील वादाला पालकमंत्री दीपक केसरकर जबाबदार आहेत. निवडणुकीपूर्वी मच्छिमारांचे प्रश्न सोडविणार म्हणणाऱ्या केसरकर यांना निवडणुकीनंतर मात्र आमच्याशी बोलण्यास वेळ नाही. चार वेळा भेटीला बोलावून बैठकीचे कारण देत निघून गेले, अशी जोरदार टीका वेंगुर्लेतील मच्छिमार बांधवांनी केली आहे. गुरूवारी मच्छिमारांच्या प्रश्नासाठी बंदर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची मच्छिमारांनी भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी दादा केळुस्कर, बाबा नाईक, वसंत तांडेल, बाबी रेडकर, दाजी खोबरेकर, अशोक खराडे, गोट्या परब आदी उपस्थित होते. मच्छिमारांच्या प्रश्नाला पूर्णपणे पालकमंत्री दीपक केसरकर हे जबाबदार आहेत. त्यांनी मनात आणले असते तर पर्ससीन व मिनी पर्ससीननेटमधील वाद मिटविला असता. ज्यावेळी हा वाद झाला तेव्हा पालकमंत्री केसरकर यांची भूमिका महत्त्वाची होती. जिल्हा पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना सोबत घेऊन आमची बैठक घेणे तेव्हा गरजेचे होते. पण ती बैठक कशासाठी घेतली नाही याचा उलगड आतापर्यंत झाला नाही, असे मच्छिमार नेते वसंत तांडेल यांनी सांगितले. यावेळी दादा केळुस्कर म्हणाले, पालकमंत्री केसरकर यांनी निवडणुकीपूर्वी जी आश्वासने दिली होती ती त्यांनी पाळली नाहीत. आम्हांला चार वेळा मच्छिमारप्रश्नी भेटण्यासाठी बोलविले होते. पण त्यांनी वेळ दिली नाही. एकदा तर कुडाळ येथील रेल्वे स्टेशनवर रात्रीच्या वेळी बोलविले होते. पण आम्हांला तेथेच ठेवून ओरोस येथून रेल्वेने मुंबईला गेले दुसऱ्यावेळी तर फळ संशोधन केंद्रावर बोलविले आणि गाडीत बसूनच निवेदन स्वीकारले. त्यावेळी बोलण्यासही दिले नाही. मग आम्ही अपेक्षा तरी काय ठेवायची, असा सवाल मच्छिमारांनी केला. बाबा नाईक म्हणाले, पालकमंत्री केसरकर यांचे आम्ही निवडणुकीत काम केले. रात्रीचा दिवस करून निवडून आणले पण त्यांनी आमचा अपेक्षाभंग केला असून पर्यटनाच्या नावाखाली मासेमारी संपविण्याचा डाव पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आखला आहे, असे सांगत फिशरमन व्हिलेज तसेच अन्य प्रकल्पांबाबत त्यावेळी विश्वासात घेतले नसल्याचा आरोपही बाबा नाईक यांनी यावेळी केला. आम्ही त्यावेळी आराखड्याला विरोध केला होता. आताही मंत्री केसरकर हे ‘मच्छिमार नसला तरी चालेल पण पर्यटन वाचले पाहिजे’ असे सांगत आहेत. त्यामुळे त्यांना मच्छिमारांची आवश्यकता नसल्याची टीकाही यावेळी मच्छिमारांनी केली. ते पुढे म्हणाले की, आम्ही अनेकांना आमच्या प्रश्नांबाबत भेटलो सर्वांनी आमची बाजू ऐकून घेतली. मात्र एकमेव पालकमंत्री केसरकर यांनी आमची बाजू ऐकून न घेताच आम्हांला चार वेळा बोलावून घेऊनही तसेच पाठवून दिले. आम्ही पालकमंत्र्याच्या विरोधात नाही. पण त्यांनी आम्हांला जी वागणूक दिली ती आम्ही कधीही विसरू शकत नाही, असेही यावेळी बाबा नाईक यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले. (प्रतिनिधी)
ाच्छिमारांशी बोलण्यास
By admin | Published: October 13, 2016 11:58 PM