कणकवली: गणेशोत्सवाला २२ ऑगस्ट पासून प्रारंभ होत आहे. यानिमित्ताने कणकवली शहरात विविध साहित्य खरेदीसाठी व इतर कारणांसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.
या अनुषंगाने नागरिकांची गैरसोय होवू नये म्हणून कणकवली शहरात १७ ऑगस्ट पासून पार्कींग व्यवस्था, भाजीपाला विक्री, फळेविक्री, एकदिशामार्ग अमलबजावणी यांचे नियोजन करण्यात आले असून नगगरपंचायतीने ठरवुन दिलेल्या जागेतच व्यवसाय करण्याचे बंधन विक्रेत्यांवर घालण्यात आले आहे.
कणकवलीतयेणार्यांची कोणतीही गैरसोय होवू नये. त्याना सहजरित्या गर्दीविना साहित्य खरेदी करता यावे. या उद्देशाने नियोजन केले असल्याची माहिती कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
कणकवली नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्ष दालनात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठकीचे आयोजन बुधवारी कऱण्यात आले होते. यावेळी नगरसेवक बंडु हर्णे, मेघा गांगण, अभिजीत मुसळे, विराज भोसले यांच्यासह महेश सावंत, बंडु गांगण, मिथुन ठाणेकर आदी उपस्थित होते.त्या बैठकीनंतर सर्वानुमते झालेल्या निर्णयाची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यानी दिली.
ते म्हणाले, गणेशोत्सवानिमित्ताने शहरात पार्कींगची व्यवस्था करण्यात आली असून लक्झरी गाड्या व ट्रक , टेम्पोसाठी मराठा मंडळ रस्ता व नरडवे रोडवर व्यवस्था करण्यात आली आहे. धान्याचा ट्रक बाजारात आणण्यास परवानगी देण्यात येईल. त्याचप्रमाणे चारचाकी गाड्यांच्या पार्कींगची व्यवस्था हॉटेल हॉर्नबील समोर त्याचप्रमाणे एस.टी.स्टँन्डसमोरील पुलाखाली करण्यात आली आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने भाजी,फळे विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरुन व्यवस्था करण्यात आली आहे.
यामध्ये अप्पासाहेब पटवर्धन चौक ते एस.टी.स्टँन्डपर्यंत पुलाखाली दोन बाजूने बसण्यास परवानगी देण्यात आली आहे . त्याचप्रमाणे गावठी बाजार हा अप्पासाहेब पटवर्धन चौक ते अभ्युदय बँक पुलाखाली पिलरच्या बाजुने भरविला जाणार आहे.
त्याचप्रमाणे फिरते व्यावसायिक, फळविक्रेते याना बाजारपेठ व डिपीरोडवर बसण्यास परवानगी दिली जाणार नाही. तेलीआळी रोडवर ते व्यवसाय करु शकतील.कणकवली आचरा रोडवर होणारी वाहतुक कोंडी व अप्पासाहेब पटवर्धन चौकात वाहतुक कोंडी होण्याची शक्यता असल्याने आचरा रोडवरुन येणारी वाहने जर नांदगाव, तळेरे येथे जाणार असतील तर त्याना मसुरकर किनई रस्त्याने वळविण्यासाठी तेथे पोलिस ठेवण्यात येतील. असे समीर नलावडे म्हणाले.
त्याचप्रमाणे कणकवलीत व्यापारासाठी महामार्गाच्या बाजूने रेषा आखली जाणार असून त्याच्या बाहेर बसणार्यांवर नगरपंचायत पथकाच्या माध्यमातुन कारवाई केली जाईल असेही समीर नलावडे यांनी यावेळी सांगितले.
तसेच नियोजनात काही बदल झाल्यास नगरपंचायतीच्यावतीने नागरिकांना वेळोवेळी त्याबाबत सूचना देण्यात येतील. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. असेही ते यावेळी म्हणाले.
अफवांवरविश्वासठेवूनका !
कणकवली बाजारपेठ सात ऑगस्टनंतर बंद ठेवणार असल्याची अफवा काही लोक पसरवित आहेत. अशा अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये . कणकवलीत काही ठिकाणी असलेले कंटेन्मेंट झोन हे दोनचार दिवसात उठतील. त्यानंतर संपुर्ण बाजारपेठ सुरु राहणार आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये असे आवाहन समीर नलावडे यानी यावेळी केले.