चिपळूण : लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरातर्फे नामवंत साहित्यकृतींना पुरस्कार दिले जातात. यावर्षी प्रा. डॉ. सदानंद मोरे यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. हे वर्ष वाचनालयाचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष होते तसेच लोकमान्यांच्या गीता रहस्याचेही शतक वर्ष आहे. रविवार, १४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता ब्राह्मण सहाय्यक संघात पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे.स्वातंत्र्य आंदोलन सर्वसामान्यांच्या घरापर्यंत नेणारे लोकमान्य मानवाचे स्वातंत्र्य म्हणजे ईश्वरदत्त अधिकार मानणारे लोकमान्य आणि त्यांचे जीवनचरित्र हा व्यासंगाचा विषय होय. कसल्याही रंगाचा चष्मा न लावता स्वच्छ नितळ डोळ्यांनी डॉ. मोरे यांनी लोकमान्यांच्या अद्भूत जीवनाचा कर्मयोगी लोकमान्य चिकित्सक अभ्यास या ग्रंथाद्वारे मांडला आहे.कवी आनंद पुरस्कार लेखक अरुण जाखडे यांच्या इर्जिक या लेखनाला दिला जाणार आहे. जाखडे हे इंजिनिअर असून, उत्तम दर्जाची भरघोस पगाराची नोकरी सोडून ग्रंथप्रेमातून त्यांनी पद्मगंधा प्रकाशन सुरु केले. नामवंत लेखकांची दर्जेदार पुस्तके प्रकाशित करताना लेखक म्हणून सर्वपरिचित झाले. ‘युगयंत्राचे आले रे अवघड सोपे झाले रे...’ असे गदिमानी एका कवितेत म्हटले आहे. पण यंत्रयुगात अनेक जुने संदर्भ दृष्टिआड होताना दिसतात. जुनी गावे, वस्ती, व्यवसाय, कृषिवलांचे जीवन याचा मागोवा अरुण जाखडे यांनी इर्जिक लेख मालिकेतून मांडला आहे. ग्रंथालयाने यावर्षी नाना भागवत गं्रथपुरस्कार देण्यास सुरुवात केली आहे. कोकणातील तरुणांमध्ये उद्योगाभिमुखता यावी, यासाठी नाना भागवतांनी आयुर्वेद औषधापासून व्यापारापर्यंत अनेक व्यवसायात तरुणांना उभे केले. माखजनजवळच्या सरंद येथे शेतीचा पथदर्शक प्रयोग साकारला. रा. स्व. संघाचे अनन्य स्वयंसेवक असलेल्या नानांच्या नावे यंदाचा पुरस्कार डॉ. श्रीरंग कद्रेकर यांच्या कोकणची पाणी समस्या व उपाय या पुस्तकाला देण्यात येणार आहे. डॉ. कद्रेकर दापोलीच्या बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचे भूतपूर्व कुलगुरू. कोकणात येणारे कोयनेचे पाणी वापराविना सागराला मिळत आहे. यावेळी इथल्या अनेक खेड्यांमधल्या माताभगिनी पाण्यासाठी वणवण करताना दिसतात. वर्षाकाळात धो धो वाहणारे धबधबे विद्युतनिर्मिती करु शकतात. या सर्वांचा सर्वांगीण विचार डॉ. कद्रेकर यांनी आपल्या पुस्तकातून मांडला आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी श्रीमंत सरदार रघुजीराजे आग्रे यांना आमंत्रित करण्यात आले आहे . श्रीमंत रघुजीराजे हे सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज आहेत. रघुजीराजे हे रा. स्व. संघाचे रायगड जिल्हा संघचालक आहेत. यावेळी कॅप्टन दिलीप भाटकर उपस्थित राहणार आहेत. डॉ. सदानंद मोरे लोकमान्याच्या जीवनावर भाष्य करणार आहेत. अरुण जाखडे समाजातून निसटत चाललेल्या भावबंधावर बोलणार आहेत व कोकणातील पाणी समस्या डॉ. कद्रेकर उलगडणार आहेत. यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ंग्र यांचे मार्गदर्शन होणार आहे.मोरे यांच्या पुरस्कारामुळे त्यांच्या आजवरच्या चिंतनाला वाचनालयाने दिलेली ही दाद असून, यानिमित्त देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये विविध क्षेत्रामधील मान्यवरांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आल आहे. (प्रतिनिधी)चिपळूण येथे होणार डॉ. सदानंद मोरे यांचा सत्कार, नामवंत साहित्यिकांना पुरस्कार.दि. १४ रोजी होणार चिपळूण येथील ब्राह्मण सहायय्क संघात कार्यक्रम, मान्यवरांची उपस्थिती.ग्रंथालयाने यंदापासून केली नाना भागवत ग्रंथपुरस्कार देण्यास सुरूवात. त्यातील पहिल्या पुरस्काराचेही वितरण यावेळी होणार. पुरस्कार वितरणासाठी श्रीमंत सरदार रघुजीराजे आग्रे यांना आमंत्रित करण्यात आलेय. वाचनालयाची तयारी सुरू.
गीतारहस्य शतक वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम
By admin | Published: June 12, 2015 10:37 PM