वेंगुर्ले : पर्यटन महोत्सवासाठी नगरपरिषद फंडातून १0 लाख रुपये खर्च करावे की नको यावर एकमत न झाल्याने हा विषय मतदानासाठी टाकला. यात १0 लाख खर्च करावे यासाठी ९ जणांनी मतदान करीत बहुमताने हा ठराव संमत केला.वेंगुर्ले नगरपरिषदेतर्फे होणाऱ्या पर्यटन महोत्सवासाठी शुक्रवारी नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन केले होते. यावेळी उपनगराध्यक्ष अभिषेक वेंगुर्लेकर, नगरसेवक रमण वायंगणकर, पद्मिनी सावंत, सुलोचना तांडेल, अन्नपूर्णा नार्वेकर, चेतना केळुसकर, अॅड. सुषमा प्रभूखानोलकर, निला भागवत, अवधूत वेंगुर्लेकर, वामन कांबळे, नम्रता कुबल, मनिष परब, अॅड. जी. जी. टांककर, प्रशांत नेरुरकर यांच्यासह कार्यालयीन अधीक्षक हनिफ म्हाळुंगकर उपस्थित होते.१२ ते १५ फेब्रुवारी दरम्यान मांडवी खाडीवर होणाऱ्या या पर्यटन महोत्सवात गायन स्पर्धा, रेकॉर्ड डान्स, वेशभूषा, वाळू शिल्प प्रदर्शन, सौंदर्यवती स्पर्धा, चित्ररथ स्पर्धांबरोेबर अन्यही सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. महोत्सवासाठी नगरपरिषदेच्या अर्थसंकल्प तरतुदीनुसार वेंगुर्ले महोत्सवासाठी ५ लाख, गौरव व कर्तव्येसाठी २ लाख, सुरक्षेसाठी २ लाख व इतर १ लाख असा १0 लाखांचा निधी मिळणार आहे. मात्र, तरतूद निधीपेक्षा नगरपरिषदेचा जास्त निधी खर्च करु नये अशी सूचना रमण वायंगणकर यांनी केली. यावर अॅड. प्रभूखानोलकर यांनी नगरपरिषदेतर्फे दिला जाणारा १0 लाखांचा निधी योग्य असल्याचे सांगितले. मात्र, या विषयावर कोणतेच एकमत न झाल्याने हा विषय मतदानासाठी टाकला. यावेळी झालेल्या मतदानात १0 लाख रुपये निधीच्या बाजूने निला भागवत, सुषमा प्रभूखानोलकर, चेतना केळुसकर, अन्नपूर्णा नार्वेकर, मनिष परब, वामन कांबळे, अवधूत वेंगुर्लेकर, पद्मिनी सावंत व नगराध्यक्ष कुबल यांनी मतदान केले. रमण वायंगणकर व सुलोचना तांडेल यांनी विरुद्ध मतदान केले तर नम्रता कुबल व अभिषेक वेंगुर्लेकर हे मात्र या विषयाबाबत तटस्थ राहिले. त्यामुळे १0 लाख रुपये खर्चासाठी बहुमत मिळाल्याने हा ठराव संमत करण्यात आला.उपनगराध्यक्ष अभिषेक वेंगुर्लेकर यांनी वेंगुर्लेतील पर्यटन स्थळांची यादी करावी, अॅड. टांककर यांनी नगरपरिषदेच्या रेकॉर्डप्रमाणे शहरातील गल्ल्यांना नावे देऊन तसे फलक लावावेत असे सुचविले. पर्यटन महोत्सवाची माहिती देण्यासाठी सर्व नागरिकांची, हॉटेल व्यावसायिक, मच्छिमार, सांस्कृतिक मंडळे, शाळांचे मुख्याध्यापक, स्टॉलधारक यांची बैठक घेण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष कुबल यांनी सांगितले.पर्यटन महोत्सवाच्या नियोजनासाठी गठीत केलेल्या विविध कमिटीपैकी स्टॉल कमिटीवर अभिषेक वेंगुर्लेकर, अवधूत वेंगुर्लेकर, अन्नपूर्णा नार्वेकर, शोभायात्रा कमिटीवर निला भागवत, चेतना केळुसकर, फिलोमिना कार्डोज, स्पर्धा कमिटीवर अॅड. टांककर, प्रशांत नेरुरकर, मनिष परब, स्टेज कमिटीवर नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल, वामन कांबळे, विविध परवानगी कमिटीवर मुख्याधिकारी रामदास कोकरे, अॅड. प्रभूखानोलकर व अॅड. टांककर तर निधी संकलन कमिटीवर प्रसन्ना कुबल, रमण वायंगणकर, सुलोचना तांडेल, नम्रता कुबल, अभि वेंगुर्लेकर यांनी निवड करण्यात आली. (प्रतिनिधी)
पर्यटन महोत्सवासाठी १0 लाख खर्च करावे
By admin | Published: January 09, 2016 12:10 AM