तळेरे : सध्या अनेक क्रीडा संकुलात खेळाडू हितापेक्षा व्यावसायिकतेला महत्त्व दिले जात असल्याने खेळाडूंची कुचंबणा होत आहे.
क्रीडा आयुक्तांच्या हे लक्षात आणून दिले असता, सर्व जिल्ह्यातील क्रीडा संकुलात शुल्क निर्धारण निश्चित करून खेळाडूंना न्याय देण्याबाबतच्या अमरावती शारीरिक शिक्षण महामंडळ व राज्य क्रीडा शिक्षक महासंघ, अहमदनगर यांच्या मागणीचा तातडीने विचार करून सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी व उपसंचालक यांना शुल्क निर्धारणाबाबत आदेशित करून वाढीव क्रीडा शुल्कास लगाम घालून खेळाडूंना न्याय दिला जाईल, असे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्याचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी आश्वासन दिल्याची माहिती राज्य समन्वयक दत्तात्रय मारकड यांनी दिली.क्रीडा आयुक्त यांच्यासोबत बालेवाडी, पुणे येथे अमरावती शारीरिक शिक्षण महामंडळ व राज्य क्रीडा शिक्षक महासंघ, अहमदनगर या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली.
मैदाने/कोर्ट वापराच्या वाढीव शुल्क आकारणीसंदर्भात व खेळाडू व्यतिरिक्त इतरांना आरक्षित करण्यात आलेल्या मैदानावरील वेळेबाबत तसेच फीट इंडिया उपक्रमाच्या यशस्वी आयोजन व वाढीव कार्यभार, बीपीएड्-एमपीएड्-एनआयएस बेरोजगार युवकांना क्रीडा प्रशिक्षकपदी नियुक्ती देण्याबाबत महामंडळाचे सहसचिव शिवदत्त ढवळे यांनी अवगत केले.खेळाडू शिष्यवृत्तीतील वाढ, पंच मानधन, खेळाडू अपघात विमा, खेळाडू दैनिक भत्त्यात वाढ, ग्रामीण क्रीडा स्पर्धा पुन्हा सुरू करणे, क्रीडा परिषदेवर ५० टक्के शिक्षक व संघटना प्रतिनिधी घेण्यात यावेत, या मागण्या महासंघाचे राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी मांडल्या.