रामचंद्र कुडाळकर, तळवडे : संपूर्ण राज्यात स्वच्छता मोहिमेचे वादळ वाहत असताना या मोहिमेचा प्रसार आता गावपातळीवरही वेगाने सुरू आहे. जिल्ह्यातील बहुतेक गावात याचे परिणाम उमटू लागले आहेत. तळवडे गावच्या बाजारपेठेतील व्यापारी वर्गानेही पुढाकार घेत स्वछता मोहीम राबवून सावंतवाडी-वेंगुर्ले, तळवडे-वेंगुर्ले, तळवडे-मातोंड, तळवडे-नेमळे अशा चार मार्गांवर तीन-तीन किलोमीटरपर्यंत दुतर्फा वाढलेली झाडी साफ केली. गावच्या विकासासाठी आणि स्वच्छतेसाठी राजकारणाला फाटा देत केवळ समाजकारणाचे ध्येय समोर ठेवून ही मोहीम राबविण्यात आली. वळणावरील वाहने दिसत नसल्याने छोटेमोठे अपघातही होत होते. सार्वजनिक बांधकाम विभागानेही याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे व्यापारी वर्गाने पुढाकार घेऊन ग्रामस्थांच्या सहकार्याने रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झुडपे साफ करून रस्ते मोकळे केले. तसेच तळवडेचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिराच्या परिसराचीही स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत फटू कांडरकर, जनार्दन परब, भरत गावडे यांनी आपल्याकडील कटर मशीन दिल्याने झाडी साफ करणे सोपे गेले. तळवडे गावातील वाडीवाडीतील ग्रामस्थांनी एकत्र येत ही स्वच्छता मोहीम यशस्वी केली. तसेच घराभोवती पाण्याचा साठा होऊ न देणे, स्वच्छतेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना राबविणे याबाबत ग्रामस्थांनी दृढनिश्चय केला. कोनापाल, मातोंड, नेमळे, होडावडे आदी मार्गावरील झाडी स्वच्छ केल्याने वाहनचालकांचा त्रास वाचणार आहे. या मोहिमेबाबत तळवडे व्यापारीवर्ग आणि ग्रामस्थांचे कौतुक होत आहे. (प्रतिनिधी)हाकेला प्रतिसादतळवडे व्यापाऱ्यांच्या हाकेला प्रतिसाद देत तळवडे ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी तसेच स्थानिक रिक्षाचालक संघटना यांनीही या मोहिमेत मोलाचे सहकार्य केले. तळवडे ते सावंतवाडी, नेमळे, मातोंड अशा चारही बाजूच्या रस्त्यांवरील झाडी मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे वाहचालकांना त्रास सहन करावा लागत होता.
स्वच्छतेचा प्रसार गावपातळीपर्यंत
By admin | Published: December 04, 2014 12:55 AM