कुडाळ : जिल्ह्यातील हत्तींना पकडून प्रशिक्षित करण्यासाठी कर्नाटकातून येणारे प्रशिक्षित हत्तींसहीतचे पथक कर्नाटक सरकारच्या परवानगीनुसार लवकरच जिल्ह्यात दाखल होणार आहे. हत्ती पकड मोहिमेची सर्व तयारी झालेली आहे, अशी माहिती कुडाळचे वनक्षेत्रपाल संजय कदम यांनी बोलताना दिली. कुडाळ तालुकाच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यात थैमान घालून अनेकांचे जीव घेतलेल्या व करोडो रुपयांच्या शेतीचे तसेच इतर वित्तहानी केलेल्या हत्तींना पकडून त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न सुरू झाले आहेत. हत्ती प्रशिक्षित करण्यासाठी आंब्रड येथे क्रॉलही उभारण्यात आला आहे. हत्तींना प्रशिक्षित करण्यासाठी कर्नाटकातून प्रशिक्षित हत्ती व त्यांचे माहूत, डॉक्टर व इतर कर्मचारी लवकरच आंब्रड येथे येण्यासाठी तयार झालेले आहेत.मात्र, अजूनही त्यांना कर्नाटक सरकारने हिरवा सिग्नल दिला नसल्याने ते पथक जिल्ह्यात येऊ शकत नाही. मात्र, येत्या दोन ते तीन दिवसातच या पथकाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाण्याकरिता कर्नाटक सरकार परवानगी देणार आहे, अशी माहिती वनक्षेत्रपाल संजय कदम यांनी दिली. (प्रतिनिधी) मोहिमेची तयारी पूर्ण --आमच्याकडून या मोहिमेसाठी लागणारी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. तर मोहिमेसाठी येणाऱ्या पथकाकडूनही कर्नाटकात तयारी पूर्ण झाली आहे. आता प्रतीक्षा फक्त ते येथे येण्याची आहे, असेही वनक्षेत्रपाल संजय कदम म्हणाले.
जिल्ह्यात लवकरच पथक दाखल होणार
By admin | Published: January 20, 2015 9:51 PM