कणकवली : एस.एस.पी.एम. कॉलेज आॅफ इंजिनिअरींग संस्थेचे सचिव नीतेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जगभरातील विद्यापीठांशी सामंजस्य कराराची प्रक्रिया सुरू करण्याच्या प्रयत्नाचे पहिले पाऊल म्हणून इंग्लंडमधील तीन आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी इंजिनिअरींगच्या पुढील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासंदर्भात संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून या विद्यापीठांशी शैक्षणिक सामंजस्य कराराची प्रक्रिया सुरू आहे. अशी प्रक्रिया सुरू असलेले हे महाराष्ट्रातील पहिलेच अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज आॅफ बर्मिंगहॅम, क्रॅनफिल्ड युनिव्हर्सिटी व कोव्हेन्टरी अॅण्ड वॉल्व्हरहॅम्पटन युनिव्हर्सिटीज् अशी या विद्यापीठांची नावे आहेत. या तीनही विद्यापीठांनी कॉलेजला ‘लेटर आॅफ इंटरेस्ट’ पाठविलेले असून येत्या दोन महिन्यांत या तीनही विद्यापीठांच्या कमिट्या भारतात येऊन कॉलेजला भेट देणार आहेत. या विद्यापीठांतर्गत विविध क्षेत्रातील पदव्या प्राप्त करण्याची सुवर्णसंधी यापुढे एस.एस.पी.एम. कॉलेजच्या विद्यार्थ्यांना लाभणार आहे. (प्रतिनिधी) जगातील पहिल्या पाच विद्यापीठांमध्ये गणती युनिव्हर्सिटी आॅफ बर्मिंगहॅम हे विद्यापीठ १३० वर्षांपासून शैक्षणिक सेवा देत असून या विद्यापीठात अनेक पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवले जातात. क्रॅनफिल्ड युनिव्हर्सिटी सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरींग अॅण्ड मॅनेजमेंट याकरिता जगातील पहिल्या पाच विद्यापीठांमध्ये गणले जाते. कोव्हेन्टरी अॅण्ड वॉल्व्हरहॅम्पटन युनिव्हर्सिटीज् हे विद्यापीठ आयटी क्षेत्रातील शिक्षणाकरिता अग्रेसर असून इंग्लंडमधील अतिशय नामांकित विद्यापीठ आहे, असे एस.एस.पी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालयाने दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी एसएसपीएम संलग्न होणार
By admin | Published: June 02, 2016 12:37 AM