सुधीर राणेकणकवली : कोरोना परिस्थिती पूर्वपदावर येत नसल्याने मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक करणाऱ्या एसटीला आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे. ही आर्थिक हानी भरून काढण्यासाठी माल वाहतुकीचा पर्याय एसटी महामंडळाने निवडला आहे.सध्यातरी त्याचाच आधार एसटीला असून सिंधुदुर्ग विभागाला मे महिन्यात माल वाहतुकीतून ११ लाख ५४ हजार ४३१ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.शहराबरोबरच ग्रामीण भागातील जनतेची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी एसटी अलीकडे तोट्यात आली आहे. कोरोनामुळे जिल्हा अंतर्गत तसेच आंतरराज्य वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग एसटी विभागाला रोजच्या २३ लाखाच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत आहे. त्यामुळे एसटीच्या तोट्यात आणखीन भर पडत आहे. तसेच इतर बाबींबरोबरच कर्मचाऱ्यांच्या वेतनावरही परिणाम होत आहे.
सिंधुदुर्ग विभागातील २१०० कर्मचाऱ्यांचे मे महिन्याचे वेतन अद्याप झालेले नाही. वेतनाचा प्रश्न वारंवार निर्माण होत असल्यामुळे कर्मचारी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे शासनाने एसटीला आर्थिक सहाय्य करावे अशी मागणी कामगार संघटनांकडून करण्यात येत आहे. त्याची दखल घेत ६०० कोटींचे अर्थसहाय्य राज्य शासनाने बुधवारी जाहीर केले. त्यामुळे कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला तरी वेतनाच्या समस्येवर कायम स्वरूपी तोडगा काढावा. तसेच एसटी फायद्यात येण्यासाठी उपाय योजना कराव्यात अशी मागणी कामगार संघटनांकडून करण्यात येत आहे.एसटीच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी माल वाहतुकीचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे. सिंधुदुर्ग विभागानेही त्यावर अमंलबजावणी करीत हापूस आंबा वाहतूक तसेच वाळू, जांभा दगड , धान्य अशा विविध मालाची वाहतूक सुरू केली आहे. त्यातून चांगले उत्पन्न मिळत आहे. या मालवाहतूक गाड्यांनी मे महिन्यात २४ हजार २४२ किलोमीटरचा प्रवास केला आहे.मे महिम्यातील उत्पन्न !
- सावंतवाडी आगार २ लाख ३४ हजार रुपये -- ५२२२ किलोमीटर अंतराचा प्रवास.
- कणकवली आगार १ लाख ४५ हजार ५०० रुपये - ३०५१ किलोमीटर अंतराचा प्रवास .
- कुडाळ आगार २लाख १२ हजार ९०४ रुपये - ४८३७ किलोमीटर अंतराचा प्रवास .
- देवगड आगार २ लाख ७० हजार ७४२रुपये - ५३२५ किलोमीटर अंतराचा प्रवास.
- मालवण आगार १८ हजार ७००रुपये, ३२८ किलोमीटर अंतराचा प्रवास .
- वेंगुर्ला आगार ५७ हजार ४२५रुपये , ११९०किलोमीटर अंतराचा प्रवास.
- विजयदुर्ग आगार २ लाख १५ हजार १६० रुपये - ४२८९ किलोमीटर अंतराचा प्रवास .