ऑनलाइन लोकमत
कणकवली, दि. 27 - कोकणातील महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडीची यात्रा 2 मार्च रोजी होत आहे. त्यासाठी एस.टी.प्रशासन सज्ज झाले आहे. सिंधुदुर्गातील सर्वच आगारातून प्रवासी उपलब्धतेनुसार जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत. आंगणेवाडी यात्रोत्सवासाठी जादा 150 गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
आंगणेवाडी यात्रेसाठी कणकवली,मालवण, कुडाळ या तालुक्यातील परिसरातून मोठया प्रमाणात जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. तर सावंतवाडी, वेंगुर्ले, देवगड, विजयदुर्ग या आगारांच्या कार्यक्षेत्रातील परिसरातूनही प्रवासी उपलब्धतेनुसार जादा गाड्या सोडण्यात येतील. याखेरीज प्रवाशांकडून मागणी झाल्यास विविध गावांतूनही गाड्या सोडल्या जाणार आहेत. आंगणेवाडी यात्रोत्सवासाठी जादा गाड्या 1 मार्च रोजी पहाटेपासून सुरू होणार असून 3 मार्चपर्यंत दिवसरात्र वाहतूक सुरू राहणार आहे.
प्रवाशांचा ओघ लक्षात घेऊन 1 मार्चला जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. कणकवली, मालवण, कुडाळ येथील यात्रास्थानांवरून पहाटे पाच वाजल्यापासून गाड्या सोडण्यात येतील. आंगणेवाडी येथे भाविक प्रवाशांसाठी प्रवासी शेड उभारण्यात आल्या असून गाडीमध्ये सुलभ प्रवेश मिळविण्याच्यादृष्टीने क्यू रेलिंग’ची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. 2 व 3 मार्चला कणकवली रेल्वेस्थानक येथून मालवण व आंगणेवाडी परिसरात जाणार्या प्रवाशांसाठी जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. याखेरीज वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी ठिकठिकाणी गस्ती पथके, क्रेन व इतर यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
एस.टी.च्या सेवेचा लाभ घ्या !
आंगणेवाडी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी रेल्वे स्थानकावरुनही प्रवाशांच्या उपलब्धतेनुसार गाड्या सोडल्या जाणार आहेत. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्वोतोपरी काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळे सुरक्षित प्रवासासाठी भाविकानी एस.टी.च्या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक चेतन हसबनीस यांनी केले आहे.