नांदगाव : देवगड-रत्नागिरी या सकाळच्या एस.टी.च्या गलथानपणामुळे साळिस्ते व वारगावच्या अनेक मुलांना शैक्षणिक नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. शनिवारी सकाळीच असणाऱ्या शाळा व कॉलेजच्या मुलांना अनेकवेळा या एस.टी.मुळे विलंब होत असल्याने मुलांसह पालकांमध्येही चीड निर्माण झाली आहे. अशाप्रकारे मुलांच्या होणाऱ्या नुकसानीस जबाबदार कोण, असाही सवाल पालकांमधून उपस्थित केला जात आहे. याबाबत माहिती अशी की, देवगड रत्नागिरी ही एस.टी. बस सकाळी ६.३० वाजता साळिस्ते येथे येते. साळिस्ते तसेच वारगावमधील अनेक विद्यार्थी खारेपाटण येथील महाविद्यालयात शिक्षणासाठी जातात. खारेपाटण महाविद्यालय सकाळी ७.१० वाजता, तर वारगाव माध्यमिक विद्यालय सकाळी ७.३० वाजता असते. साळिस्ते येथे सुमारे १५ विद्यार्थी-विद्यार्थिनी वारगावला माध्यमिक शाळेत, तर खारेपाटणला महाविद्यालयात शिक्षणासाठी जातात. विशेष म्हणजे शनिवारी अनेकवेळा ही गाडी थांबवली जात नाही आणि थांबलीच तर एस.टी. थांब्यापासून खूप अंतरावर थांबवली जाते. यामुळे काही विद्यार्थी जातात, तर काही एस.टी. बसपर्यंत धावत जाईपर्यंत गाडी निघून जाते.वारंवार अशा घडणाऱ्या प्रकारामुळे विद्यार्थी नाराज असून, पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या एस.टी.नंतर सात वाजता कणकवली-रत्नागिरी एस.टी. आहे आणि त्यानंतर निमआराम एस.टी. असल्याने पासही चालत नाही. त्यामुळे नाहक भुर्दंड भरत विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतोच, शिवाय शाळा, महाविद्यालयात उशिरा पोहोचले जातात. याबाबत विद्यार्थी नाराज असून एस. टी. महामंडळाकडून योग्य दखल घेण्यात यावी, अशी मागणी आहे.याबाबत विद्यार्थ्यांशी संपर्क साधला असता असे समजले की, अनेकवेळा या बसला महिला वाहक असते. त्यामुळे एस.टी. बसस्टॉप सोडून पुढे का थांबवली अथवा काही विचारले जात नाही. मात्र, तसे कोणी विचारलेच तर उलट उत्तराशिवाय काहीच मिळत नाही. यामुळे सकाळची देवगड-रत्नागिरी बस नाही मिळाली तर मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होतेच, तर अनेकवेळा विद्यार्थी पास असूनही आर्थिक भुर्दंड भरावा लागतो. ग्रामीण भागातून विद्यार्थी शिक्षणासाठी प्रवास करतात. अशा मुलांना प्रोत्साहन दिले पाहिजे. (वार्ताहर)प्रशासनाने दखल घ्यावीदेवगड-रत्नागिरी या सकाळच्या बसला नेहमी महिला वाहक असते. त्यामुळे एस.टी. बस स्टॉप सोडून पुढे का थांबवली अथवा काही विचारले जात नाही. मात्र, तसे कोणी विचारलेच तर उलट उत्तराशिवाय काहीच मिळत नाही. यामुळे सकाळची देवगड-रत्नागिरी बस नाही मिळाली तर मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत एस. टी. प्रशासनाने दखल घ्यावी. या मार्गावरील विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.
एस.टी.मुळे विद्यार्थ्यांना भुर्दंड
By admin | Published: December 15, 2014 7:49 PM