कणकवली : एस.टी.कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी केलेल्या संपामुळे एका दिवसाला आठ दिवस वेतन कपातीचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्या निर्णयाला कोल्हापूर औद्योगिक न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे, अशी माहिती महाराष्ट्र एस.टी.वर्कर्स काँग्रेस (इंटक) चे सिंधुदुर्ग विभागीय अध्यक्ष अशोक राणे यांनी दिली आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, एस.टी. कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर विभागातील कर्मचाऱ्यांच्या एका दिवसाला आठ दिवसाचे वेतन कपात करण्याचे प्रशासनाने ठरविले होते. परिवहनमंत्र्यानी इंटकच्या पदाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेच्यावेळी वेतन कपात करणार नसल्याचे आश्वासन दिले होते. मात्र, मान्यताप्राप्त संघटनेच्या दबावाखाली चुकीच्या पद्धतीने वसुलीचे आदेश प्रशासनाने दिले होते. त्याला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सन २00५ मध्ये प्रसारीत केलेल्या वेतनकपातीच्या परिपत्रकाद्वारे ही वसुली करण्याचे आदेश विभागीय पातळीवर देण्यात आले होते. मात्र २00५ नंतर दोन वेळा संप होऊनही अशी कारवाई झाली नव्हती. वेतन कपात केल्यामुळे कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण होणार आहे. तसेच हा निर्णय आर्थिक नुकसानकारक व बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. दरम्यान, कामगार संघटनेने अशाप्रकारची वसुली करण्यासाठी अप्रत्यक्षपणे प्रशासनावर दबाव आणून कामगार विरोधी धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे कामगार संघटनेचे कर्मचारी नाराज झाले आहेत. तसेच त्यांच्यात असंतोष वाढला आहे. या निर्णयामुळे कामगार संघटनेस सणसणीत चपराक बसली आहे, असेही या पत्रकात म्हटले आहे. (वार्ताहर)
एस.टी. कर्मचारी वेतन कपातीस स्थगिती
By admin | Published: January 05, 2016 12:09 AM