कणकवली: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासन व एसटी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेच्यावतीने बुधवारी कणकवली बसस्थानकात निदर्शने करण्यात आली. यावेळी पदाधिकारी व एसटी कामगारांनी जोरदार घोषणाबाजी केली. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा कामगार नेते दिलीप साटम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी विनय राणे, अनिल नर, उमेश बोभाटे, नंदू घाडी, प्रकाश वालावलकर, गुरू सामंत, बाबा इस्वलकर, राठवड यांच्यासह एसटी आगारातील बहुसंख्य कामगार उपस्थित होते. संघटनेने राज्य शासन व एसटी प्रशासन यांना निवेदन देवून विविध मागण्या केल्या आहेत. यामध्ये १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२४ या कालावधीतील कामगारांची थकबाकी त्वरित अदा करावी, २०१८ ची महागाई भत्त्याची थकबाकी कामगारांना अदा करण्याचा न्यायालयाच्या आदेशाचे त्वरित अंमलबजावणी करावी, सन २०१६ ते २०२०या कालावधीत एकतर्फी जाहीर केलेली वेतन वाढ यातील मान्य केल्याप्रमाणे घरभाडे भत्त्याचा दर ८,१६,२४ टक्के करून थकबाकी त्वरित अदा करावी, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य परिवहन कामगारांचा महागाई भत्ता ५३ टक्के करुन थकबाकीसह त्वरित द्यावा यासह अशा विविध मागण्या असून त्याची पूर्तता होण्यासाठी यावेळी लक्ष वेधण्यात आले.
कणकवली बसस्थानकात एसटी कामगारांची निदर्शने; प्रलंबित मागण्यांकडे वेधले लक्ष
By सुधीर राणे | Updated: March 5, 2025 16:42 IST