सिंधुदुर्ग : नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर मालवण येथे पंतप्रधान येणार असल्याने गेली कित्येक वर्षे मालवण बंदर जेटी परिसरात आपला वसविलेला व्यवसाय बंद करून ज्या प्रशासनाला सहकार्य केले तेच प्रशासन आता या स्टॉलधारकांच्या उदरनिर्वाहावर उटले आहेत. नौदल दिन उलटून १५ दिवसांचा कालावधी उलटला तरी या स्टॉलधारकांचे पुनर्वसन करण्याकडे महाराष्ट्र बंदर विभाग दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे या स्टॉल धारकांवर आता उपासमारीची वेळ आली असून, या स्टॉलधारकांनी आपल्याला मालवण बंदर जेटी परिसरात तात्पुरत्या स्वरूपात स्टॉल लावण्यास परवानगी मिळावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले.मालवण जेटी बंदर आणि तारकर्ली बंदर जेटी परिसरात गेली कित्येक वर्षे स्थानिक तरुण तरुणी आणि नागरिक लहान मोठा स्टॉल लावून आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. मात्र, ४ डिसेंबरला नौदल दिन साजरा होत असल्याने आणि या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी येत असल्याने या स्टॉलधारकांना आपले स्टॉल काढण्यासाठी बंदर विभागाकडून सांगण्यात आले होते. तसेच हा कार्यक्रम झाला की स्टॉलधारकांचे पुनर्वसन केले जाईल असे आश्वासन देण्यात आले होते असे यावेळी या स्टॉलधारकांचे नेतृत्व करणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ. जितेंद्र केरकर यांनी सांगितले.
या स्टॉलधारकांनी प्रशासनाला आणि बंदर विभागाला पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी सहकार्य करत आपले स्टॉल काढले होते. मात्र, नौदल दिन साजरा होऊन १५ दिवसांचा कालावधी झाला तरी बंदर विभाग व प्रशासनाकडून या स्टॉल धारकांच्या पुनर्वसन केले जात नाही, तसेच त्यांना तात्पुरत्या स्वरूपात स्टॉल लावण्यास परवानगी दिली होती.