सांगली : महापालिकेत सुशोभिकरणाच्या कामामुळे निर्माण झालेला जागेचा प्रश्न आता सभापतींच्या अडचणीचा ठरत आहे. त्यांना महापालिकेत बसण्यासाठी जागाच नसल्याने गटनेते किशोर जामदार यांनी आपल्याच कार्यालयात त्यांना जागा दिली. सभापतींच्या स्वीय सहाय्यकांसह स्थायी समितीचा कारभार आता गटनेत्यांच्या कार्यालयातून सुरू झाला आहे. महापालिकेत सध्या आयुक्तांच्या कार्यालयाचे सुशोभिकरण सुरू आहे. या कार्यालयाचे काम गेल्या तीन महिन्यांपासून सुरू आहे. अद्याप काम पूर्ण होण्यास आठवड्याभराचा कालावधी लागणार आहे. आयुक्तांनी त्यांचे कार्यालय स्थायी समिती सभापतींच्या कार्यालयात थाटले आहे. त्यामुळे नव्या सभापतींना महापालिकेत जागाच शिल्लक राहिली नाही. गेल्या चार दिवसांपासून सभापती महापालिकेत येऊन पुन्हा माघारी परतत आहेत. सभापतींच्या या अडचणीची दखल किशोर जामदार यांनी घेतली. त्यांनी आपल्या खुर्चीलगतच सभापतींची जुनी खुर्ची ठेवली. गटनेत्यांच्याच स्वीय सहाय्यकांशेजारी सभापतींच्या स्वीय सहाय्यकांची जागा करण्यात आली आहे. दोन पदाधिकाऱ्यांनी एकाच कार्यालयातून संयुक्त कारभार सुरू केला आहे. आयुक्तांचे कार्यालय सुशोभित झाल्याशिवाय आता सभापतींना कार्यालय मिळणार नाही. सुशोभिकरणाचे काम अजून आठवडाभर चालणार आहे. (प्रतिनिधी)उपायुक्तांनाही कार्यालयआयुक्त कार्यालयाबाहेर असणाऱ्या प्रतीक्षा कक्षाची जागा आता मिरज उपायुक्तांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. याठिकाणी उपायुक्तांसाठी कार्यालय करण्यात येईल. मिरजेत बैठकीसाठी किंवा दैनंदिन कामासाठी उपायुक्त सांगलीला आल्यानंतर त्यांना याठिकाणी जागा मिळत नाही. त्यामुळेच त्यांच्यासाठी कार्यालय थाटण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
गटनेत्यांच्या कार्यालयातूनच स्थायी सभापतींचा कारभार
By admin | Published: December 08, 2014 11:49 PM