ठळक मुद्देमाजगाव येथे उभा टेम्पो आगीच्या भक्ष्यस्थानी; आगीचे कारण अस्पष्ट तब्बल ५० लाख रुपयांचे नुकसान : पोलिसांनी केला पंचनामा
सावंतवाडी : माजगाव गरड येथे चालकाने आपल्या घराशेजारी पार्क करून ठेवलेल्या टेम्पोला अचानक आग लागून टेम्पोसह आतील कपडे, लोखंडी, प्लास्टिक सामान, तेल, वायर जळून खाक झाले. टेम्पोसह ५० लाखांचे नुकसान झाले. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली असून सावंतवाडी नगरपालिका अग्निशमन दल व शिवसेनेचे उपशहरप्रमुख विशाल सावंत यांच्या खासगी टँकरला चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. माजगाव गरड भागात राहत असलेले टेम्पोचालक तन्वीर शेख यांनी बुधवारी कोल्हापूर येथून सावंतवाडी व बांदा येथील दुकानांचा होलसेल माल भरून दुपारी टेम्पो आपल्या घराशेजारी पार्क करून ठेवला होता. गुरुवारी तो माल वितरित केला जाणार होता. गुरुवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास टेम्पोला आग लागल्याचे तेथील रहिवाशांच्या लक्षात आले.तत्काळ याची माहिती देण्यात आली. तेथील नागरिकांसह मित्र परिवार यांनी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. टेम्पोत प्लास्टिक वायर होती. तिने पेट घेतल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. पहाटे सहा वाजण्याच्या दरम्यान आग आटोक्यात आणण्यात यश आले. पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला. आगीचे कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.माजगाव येथे उभा टेम्पो आगीच्या भक्ष्यस्थानी; आगीचे कारण अस्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 6:50 PM