सिंधुदुर्ग : जिल्हा काँग्रेसमधील मरगळ झटकून कामाला लागा. जनतेच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन त्यांच्या मनात युती सरकारच्या विरोधात असलेल्या भावना जाणून घेण्यासाठी जिल्ह्यात २० ते २४ नोव्हेंबर या कालावधीत ‘संपर्क यात्रे’ची मोहीम हाती घ्या असे सक्त आदेश महाराष्ट्र राज्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सिंधुदुर्ग काँग्रेस जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांना देत गद्धारांना डच्चू द्या असेही सूचित केले.मुंबई टिळक भवन येथे गुरुवारी माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची बैठक पार पडली. यावेळी माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, खासदार हुसेन दलवाई, ऑल इंडिया काँग्रेस कमिटी, महाराष्ट्र, सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसचे प्रभारी राजन भोसले व माजी आमदार सुभाष चव्हाण तसेच सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विकास सावंत, सरचिटणीस सोमनाथ टोमके, जिल्ह्यातील प्रमुख नेते व सर्व तालुका अध्यक्ष उपस्थित होते. बैठकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस पक्षामधील मरगळ दूर करण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यासाठी कृती-आराखडा तयार २० ते २४ नोव्हेंबर कालावधीत जनतेपर्यंत प्रत्यक्ष गाठीभेटी व महाराष्ट्रातील निष्क्रीय भाजपा, शिवसेना सरकार विरोधात जनतेच्या भावना जाणून घेण्यासाठी ‘संपर्क यात्रे’चे नियोजन करण्यात आले. दुटप्पी चाली खेळणाऱ्या स्वार्थी आणि गद्दारांना डच्चू देण्याचा आदेश अशोक चव्हाण यांनी जिल्हाध्यक्ष सावंत यांना दिले. मुंबई येथे पार पडलेल्या काँगेसच्या बैठकीत माजी आमदार सुभाष चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, खासदार हुसेन दलवाई, जिल्हाध्यक्ष विकास सावंत व अन्य उपस्थित होते.
संपर्क यात्रेची मोहीम हाती घ्या; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 5:25 PM