मालवण : सागरी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्याच्या सागरी हद्दीत संयुक्त गस्त घालण्याच्या सूचना शासनाच्यावतीने संबंधित विभागास करण्यात आल्या आहेत. त्यानुसार सकाळपासून संयुक्त सागरी गस्तीस सुरवात करण्यात आली.
या संयुक्त गस्तीद्वारे गस्त घालताना येथील सागरी हद्दीत परराज्यातील, परजिल्ह्यातील पर्ससीन, हायस्पीडची घुसखोरी रोखण्याबरोबरच अनधिकृत मासेमारीवर कडक कारवाई करण्याच्या सूचना मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.सागरी सुरक्षितता महत्त्वाची असल्याने बंदर, मत्स्य, पोलिस, सागरी पोलिस, सागर सुरक्षा रक्षक यांनी संयुक्तरीत्या समुद्रात गस्त घालण्याचे आदेश शासनाच्यावतीने देण्यात आले आहेत. त्यानुसार संयुक्त गस्तीस सुरवात झाली. सध्या जिल्ह्याच्या सागरी हद्दीत पर्ससीन, हायस्पीड ट्रॉलर्सची मोठ्या प्रमाणात घुसखोरी होत असल्याने मच्छिमारांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता.दहा ते बारा वावा (समुद्री अंतर) च्या आत घुसखोरी होत असतानाही मत्स्य व्यवसाय विभागाकडून कोणतीही कार्यवाही केली जात नसल्याने समुद्रात संघर्षाची चिन्हे निर्माण झाली होती. त्यामुळे या गंभीर प्रश्नाकडे मच्छिमार नेते बाबी जोगी यांनी आमदार वैभव नाईक यांचे लक्ष वेधत आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ राबविण्यात याव्यात अशी मागणी केली.
त्यानुसार नाईक यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांचे लक्ष वेधले असता त्यांनी एक बैठक घेत मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांना कडक कारवाईच्या सूचना दिल्या.मंगळवारी येथील समुद्रात सकाळपासून संयुक्त गस्त घालण्यात आली. यात बंदर, मत्स्य परवाना अधिकारी, सागरी पोलिस कर्मचारी, सुरक्षा रक्षक, पोलिस कर्मचारी आदी सहभागी झाले होते.
या संयुक्त गस्तीमध्ये मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारीही सहभागी झाले असल्याने त्यांनी समुद्रातील परराज्यातील ट्रॉलर्सची घुसखोरी तसेच अनधिकृत मासेमारी रोखत त्यांच्याविरोधात कडक कारवाई करावी अशा सूचना देण्यात आल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले.गस्त कायमस्वरूपी राहावीया संयुक्त गस्तीमुळे परराज्यातील ट्रॉलर्सच्या घुसखोरीला निश्चितच आळा बसेल असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला. दरम्यान येथील समुद्रात सुरू केलेली संयुक्त गस्त कायमस्वरूपी सुरू राहावी अशी मागणी मच्छिमारांनी केली आहे.