मालवण : कोरोनाच्या काळात राज्य सरकार पूर्णपणे भिकारी झाले आहे. बंधाऱ्यांसाठी एक रुपयाचा निधी देणार नाही. त्यामुळे कोणतीही कारणे न सांगता मसुरकर जुवा बेटावरील बंधाऱ्यांसाठी दोन दिवसांत दगड पडायला हवे. दगड न पडल्यास माझ्याशी गाठ आहे. गुन्हा दाखल करायचा असेल तर तो माझ्यावर करा, असा इशारा माजी खासदार निलेश राणे यांनी पत्तन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.गेले अनेक दिवस चर्चेत असलेल्या मालवण मसुरे येथील मसुरकर जुवा बेटावरील बंधारा लोकवस्ती सोडून बांधण्यात आला आहे. त्यामुळे या बंधाऱ्यांचे काम करणाऱ्या ठेकेदाराचे बिल अदा करू नये. यासह अन्य मागण्यांसाठी बेटावरील ग्रामस्थांनी सोमवारी माजी खासदार निलेश राणेंची भेट घेतली होती. यावेळी निलेश राणेंनी मी बंधाऱ्यांची पाहणी करणार असल्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. त्यानुसार राणे यांनी मसुरे मसुरकर जुवा बेटावरील बंधाऱ्यांची पाहणी केली.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आशिष हडकर, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, बाबा परब यांसह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी निलेश राणेंनी बेटावरील ग्रामस्थांकडून बंधाऱ्यांची माहिती घेतली. त्यानंतर उपस्थित असलेल्या पत्तन विभागाच्या अधिकाऱ्यांचा त्यांनी आपल्या भाषेत समाचार घेतला. लोकवस्ती सोडून बंधारा का बांधला ? लोकांचे जीव गेले तर तुमच्यावर गुन्हा दाखल करू. दोन टोकाला बंधारा बांधला.
तिकडे आमदाराचा कोण नातेवाईक आहे का ? मी आमदारासारखा नाही. जे काही करायचे ते समोर करणार. ठेकेदाराला कोणतेही बिल अदा न करता परवापासून लोकवस्ती ठिकाणी दगड पडायला हवे. कसे टाकायचे, काय करायचे हा तुमचा प्रश्न आहे. येथील काम तत्काळ सुरु झाले पाहिजे, असेही राणे म्हणाले.