कणकवली : कुडाळ तालुक्यातील पणदूर- घोटगे रस्त्याचे काम अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. जिल्ह्यात अन्य तालुक्यातील कामे सुरू असून हे काम करण्यास विलंब का? या रस्त्याच्या कामासाठी आलेले ५० बॅरल डांबर कशासाठी वापरले? या रस्त्याचे खड्डे भरण्याचे काम दोन दिवसात सुरू न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल .असा इशारा कुडाळ शिवसेना उपतालुका प्रमुख महेश सावंत यांनी कार्यकारी अभियंता प्रदीप व्हटकर यांना दिला.यावेळी महेश सावंत यांच्यासोबत भडगाव उपसरपंच तुळशीदास गुरव तसेच इतर शिवसैनिक उपस्थित होते. कार्यकारी अभियंता व्हटकर यांच्याशी त्यांनी विविध मुद्यांवरून चर्चा केली.गेले दोन महिने पणदूर- घोटगे रस्त्याचे खड्डे भरण्याचे काम बंद आहे. ते काम कधी सुरू करणार ? अशी विचारणा महेश सावंत यानी केली. यावेळी या रस्त्याच्या कामासाठी डांबर उपलब्ध नसल्याचे प्रदीप व्हटकर यांनी सांगितले. त्यावर ठेकेदाराना मागणीनुसार डांबर मिळते. मग प्रशासनाला कसे उपलब्ध होत नाही. असा प्रश्न महेश सावंत यांनी उपस्थित केला.पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे खड्डे भरण्याचे काम व्हायला हवे . मागच्या पावसाळ्यात या रस्त्याचे खड्डे जांभ्या दगडाने भरले होते. त्यासाठी १७ लाख रुपये खर्च करण्यात आले होते. त्याच रस्त्यावर आता पुन्हा खड्डे भरण्यासाठी पैसे खर्च करण्यात येणार आहेत .
यामुळे जनतेचे पैसे वाया जाणार आहेत. त्यामुळे या रस्त्याची पाहणी करून ज्या ठेकेदाराने या रस्त्याचे काम घेतले आहे त्याने किती खड्डे बुजविले याची माहिती घ्या. तसेच तातडीने खड्डे बुजविण्याचे काम करा .अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल.असा इशारा सावंत व गुरव यांनी यावेळी दिला. प्रदीप व्हटकर यांनी संबधित रस्त्याची संयुक्त पाहणी आपण करूया असे यावेळी सांगितले.
जनतेचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. आधी जनतेला प्राधान्य द्या आणि मग ठेकेदारांचा विचार करा. रस्त्याचे काम केल्यावर ठेकेदाराच्या दायित्व कालावधीत त्याच्याकडूनच काम करून घ्या. खात्यामार्फत विनाकारण कामांवर निधी खर्च करू नका.असेही त्यांनी यावेळी व्हटकर याना सांगितले.