कणकवली : जनतेच्या हिताच्या दृष्टिने महत्वपूर्ण असलेल्या सोनवडे घाट मार्गाचे प्रत्यक्ष काम 31 जानेवारी पर्यन्त सुरु करण्यात यावे. तसे न झाल्यास 11फेब्रुवारी रोजी मुंबई गोवा महामार्गावर पणदुर फाटा येथे सोनवडे घाट मार्ग संघर्ष समितीच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यासाठी प्रांताधिकारी नीता शिंदे-सावंत यांच्याकडे गुरुवारी सुपुर्द करण्यात आले.सोनवडे घाटमार्ग संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष प्रा. महेंद्र नाटेकर यांच्या नेतृत्वाखाली कणकवली येथील कार्यालयात प्रांताधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी सोनवडे सरपंच उत्तम बांदेकर, संतोष पवार , सत्यवान ढवळ, दाजी तवटे, विलास ढवळ, वासुदेव सावंत, सखाराम मेस्त्री , भगवान शिंदे, सखाराम शिंदे, चंद्रकांत रेडकर आदी उपस्थित होते.यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कोल्हापुरला जाण्यासाठी फोंडा, करुळ, भुईबावडा, आंबोली, आंबा आदी घाट मार्ग आहेत. परंतु हे घाटमार्ग दुर्गम आहेत. त्यांची लांबी 10 ते 15 किलोमीटर्स आहे. तसेच उंचीही जास्त आहे. पावसाळ्यात दरडी कोसळून याठिकाणी अनेकवेळा अपघात होत असतात. या पार्श्वभूमिवर सोनवडे घाट मार्गाचा विचार केल्यास त्याची लांबी सहा ते सात किलोमीटर आहे. वळणेही कमी आहेत. तसेच ऊँची कमी असून सर्वात सुरक्षित असा हा घाट मार्ग आहे.कोल्हापुरचे अंतर सुमारे 40 किलोमीटर्सने कमी होते. त्यामुळे इंधन व वेळेची बचत होते. हा घाटमार्ग व्हावा यासाठी आम्ही अनेकवेळा मागणी केली असून विविध आंदोलने केली आहेत. या आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून 31 मे 2018 रोजी सोनवडे घाट मार्गाच्या पायथ्याशी आत्मदहन करण्यासाठी कोल्हापुर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो ग्रामस्थ जमले होते. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यानी लेखी पत्र देवून जानेवारी 2019 मध्ये प्रत्यक्ष घाटमार्गाच्या कामाला सुरुवात करतो असे लेखी आश्वासन दिले होते.त्यामुळे आम्ही आत्मदहन आंदोलन थांबविले होते. महसुलमंत्र्यानी डिसेंबर मध्ये या कामाची निविदा काढली जाईल असे सांगितले होते. परंतु तसे काहीही अद्याप झालेले नाही . त्यामुळे 31 जानेवारी पर्यन्त प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल.असेही या निवेदनात म्हटले आहे.शासन चालढकलपणा करीत आहे!फोण्डाघाट मार्ग अभयारण्यातून जात आहे. त्याला शासनाचा विरोध नाही.परंतु सोनवडे घाट मार्ग त्या अभयारण्यापासून दहा किलोमीटरवरुन जात आहे. तो मार्ग करण्यास शासन चालढकलपणा करीत आहे.असे का? असा प्रश्नही या निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग : सोनवडे घाट मार्ग काम सुरु करा ; अन्यथा 11 फेब्रुवारी रोजी रास्ता रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2019 1:43 PM
जनतेच्या हिताच्या दृष्टिने महत्वपूर्ण असलेल्या सोनवडे घाट मार्गाचे प्रत्यक्ष काम 31 जानेवारी पर्यन्त सुरु करण्यात यावे. तसे न झाल्यास 11फेब्रुवारी रोजी मुंबई गोवा महामार्गावर पणदुर फाटा येथे सोनवडे घाट मार्ग संघर्ष समितीच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल . असे निवेदन महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यासाठी प्रांताधिकारी नीता शिंदे-सावंत यांच्याकडे गुरुवारी सुपुर्द करण्यात आले.
ठळक मुद्देसोनवडे घाट मार्ग काम सुरु करा ; अन्यथा 11 फेब्रुवारी रोजी रास्ता रोको आंदोलनप्रांताधिकाऱ्याकडे निवेदन सुपुर्द