कणकवली : महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या मान्यतेने सिंधुदुर्ग जिल्हा हौशी मुष्ठीयुध्द असोसिएशन आयोजित ८० वी पुरुष व १८ वी युवा महिला राज्यस्तरीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा २२ ते २८ जून या कालावधीत कणकवली येथील श्री चौंडेश्वरी सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच होणाऱ्या या स्पर्धेत ३५० ते ४०० बॉक्सर, पंच व प्रशिक्षक सहभागी होणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा हौशी मुष्ठीयुध्द असोसिएशनचे सचिव डॉ. राजाराम दळवी यांनी दिली.कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र रेफरी समितीचे चेअरमन व तांत्रिक अधिकारी (मुख्य) राजन जोथाडी, महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना उपाध्यक्ष भरतकुमार व्हावळ, जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष सुभाष दळवी, खजिनदार कृष्णा मातेफोड, सदस्य एकनाथ चव्हाण, नरेंद्र सावंत, विजय घरत, संतोष गुराम, श्रीकृष्ण आजगावकर, सर्वेश दळवी, रुपेश दळवी आदी उपस्थित होते.दळवी म्हणाले, या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा २२ जून रोजी सकाळी ११.३० वाजता होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते होईल. तर स्पर्धेचा समारोप सोहळा २८ जून रोजी सायंकाळी ३ वाजता होणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे , सिंधुदुर्ग जिल्हा हौशी मुष्ठीयुध्द असोसिएशनचे अध्यक्ष अभिमन्यू रासम तसेच राज्य संघटनेचे पदाधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. विजेते चेन्नई येथे राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत प्रतिनिधित्व करणारही स्पर्धा वजनी गटात खेळविली जाणार आहे. तसेच या स्पर्धेतील विजेत्यांना पदक तसेच प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेतील विजेते चेन्नई येथे ५ जुलै पासून होणाऱ्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. या स्पर्धेचा लाभ सिंधुदुर्गातील क्रीडा रसिकांनी घ्यावा ,असे आवाहनही डॉ.राजाराम दळवी यांनी केले.
कणकवलीत उद्यापासून राज्यस्तरीय 'बॉक्सिंग अजिंक्यपद' स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 4:39 PM