कणकवली : बाजारपेठ मित्रमंडळाच्यावतीने प. पू. भालचंद्र महाराजांच्या १११व्या जयंती दिनाचे औचित्य साधून ११ ते १८ जानेवारी २०१५ या काळात राज्यस्तरीय खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन येथील मुडेश्वर मैदानावर करण्यात आले आहे. स्पर्धेचे हे २७ वे वर्ष असून विजेत्या संघास १ लाख १ हजार १११ रूपये रोख व चषक देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती बाजारपेठ मित्रमंडळाचे अध्यक्ष व कोकण सिंचन पाटबंधारे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली.येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी स्पर्धा आयोजन समितीचे सदस्य नगरसेवक रूपेश नार्वेकर, सोमनाथ गायकवाड, प्रसाद अंधारी, आदित्य सापळे, गौतम खुडकर, अमित मयेकर, हरेश निखार्गे, गौरव हर्णे आदी उपस्थित होते.अंतिम सामन्यासाठी ‘थर्ड अंपायर’ असणारनामवंत क्रिकेटपटूंनाही या स्पर्धेसाठी आमंत्रित करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी अद्ययावत स्टेडियम बनविण्यात येणार असून खेळाडूंसाठी ड्रींकट्रॉलीची व्यवस्था केली जाईल. १८ जानेवारी रोजी स्पर्धेच्या अंतिम दिवशी खेळविण्यात येणाऱ्या सामन्यांसाठी ‘थर्ड अंपायर’ नियुक्त केले जाणार आहेत. तसेच मैदानात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांसाठी मोफत लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. या ड्रॉमध्ये विजयी होणाऱ्याला मोटारसायकल भेट देण्यात येणार आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धेच्या ठिकाणी चिअर्स गर्ल्सही उपस्थित राहणार आहेत.८ षटकांच्या या स्पर्धेतील उपविजेत्या संघास रोख रूपये ५० हजार १११ व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तर उपांत्य सामन्यातील पराभूत संघांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रत्येक सामन्यातील सामनावीरालाही गौरविण्यात येणार आहे. प्रत्येक षटकार व चौकारासाठी पारितोषिक देण्याबरोबरच इतर वैयक्तिक बक्षीसेही ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संघांनी ७ जानेवारीपर्यंत आदित्य सापळे, गौरव हर्णे, मयूर पेडणेकर यांच्याकडे आपली नावे नोंदवावीत, असे आवाहनही यावेळी पारकर यांनी केले. (वार्ताहर)
कणकवलीत ११पासून राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा
By admin | Published: December 19, 2014 9:30 PM