ऑनलाइन लोकमत
सिंधुदुर्ग, दि. 5 - सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेतर्फे खुल्या सागरी राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेच्या मान्यतेने ही स्पर्धा पार पडणार आहे. यंदा या स्पर्धेचे ७ वे वर्ष आहे. दिनांक ७ आणि ८ जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील निसर्गरम्य अशा 'चिवला' समुद्र किनाऱ्यावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
यात एकूण १२०० मुले-मुली,पुरुष-महिला आणि काही दिव्यांग गट देखील सहभागी होणार आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने यंदा प्रथमच 'बीच गेम्स'( किनारी स्पर्धांचे )देखील आयोजन करण्या आले आहे.यात रन-स्वीम-रन स्पर्धा, बीच फ्लॅग स्पर्धा, ९० मीटर बीच स्प्रिंट स्पर्धा, बीच रिले स्पर्धा, बीच लॉंग रन स्पर्धा अशा एकूण ५ स्पर्धा होणार आहेत.
यात पारितोषिक म्हणून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे रोख रुपये ५०००,३००० आणि २००० आणि या तीन नंबर नंतर येणाऱ्या पुढील १० क्रमांकातील खेळाडूंना प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून प्रत्येकी १००० रुपये देण्यात येणार आहेत.या व्यतिरिक्त या विजेत्या खेळाडूंना बॅगा आणि घड्याळे देखील भेट देण्यात येणार आहेत.