कुडाळ : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वेताळबांबर्डे नं. १ चे पदवीधर शिक्षक संजय रमाकांत बगळे यांना सन २०१५-१६ चा महाराष्ट्र शासनाचा राज्य शिक्षक पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. बगळे जिल्हा परिषद शिक्षण समितीचे निमंत्रित सदस्य आहेत. एनसीपीए हॉल, नरिमन पॉर्इंट, मुंबई येथे हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, खासदार अरविंद सावंत, आमदार राज पुरोहित, आमदार नार्वेकर, राज्याचे शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, शिक्षण आयुक्त धीरजकुमार, शिक्षण संचालक गोविंद नांदेड व नामदेव जरग यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पुरस्कारप्राप्त शिक्षकांना एक लाख दहा हजारचा धनादेश, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व पुस्तिका देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कारप्राप्त परिचय पुस्तिकेत बगळे यांच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे. सहायक शिक्षक पदावर १८ वर्षे सेवा करत असताना पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मार्गदर्शक अशा पुस्तकाचे लेखन, ज्ञानरचनावाद गणित आराखडा, लेखन व अंमलबजावणी, बालमिलिटरी पथकाची स्थापना, शैक्षणिक साहित्य निर्मिती-एपिस्कोप, अंकगणित खेळ, मार्गदर्शन केलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेत तसेच क्रीडा स्पर्धांत शिष्यवृत्ती प्राप्त, कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत आकाशवाणीवर गीतांचे सादरीकरण, आदी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल राज्य शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी आईवडील, कुटुंबीय, गुरूजन, विविध क्षेत्रातील मान्यवर व मित्रमंडळींच्या प्रेरणेमुळे व प्रामाणिकपणामुळे हा पुरस्कार आपल्याला प्राप्त झाल्याचे संजय बगळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
संजय बगळे यांना राज्य शिक्षक पुरस्कार
By admin | Published: October 13, 2016 9:34 PM