दोडामार्ग : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी व अन्य प्रमुख मागण्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना द्यावयाचे १० हजार सह्यांचे निवेदन दोडामार्ग तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवासी नायब तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे सुपुर्द केले.यावेळी दोडामार्ग मराठा संघटनेचे तालुकाध्यक्ष सोनू गवस, उपाध्यक्ष दिवाकर गवस, सचिव उदय पास्ते, गणेशप्रसाद गवस, रंगनाथ गवस, चंद्रशेखर देसाई, गोपाळ गवस, सरपंच संगीता देसाई, विठ्ठल दळवी, चंदन गावकर आदी उपस्थित होते.या निवेदनात मराठा बांधवांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या अत्यंत महत्त्वाच्या सुनावणीत मराठा समाजाचा घात झाला असून राज्यात मराठा समाजाच्या लागू असलेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. राज्यात तळागाळात राहणारा मराठा समाज अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगत आहे.
मागील सरकारने मराठा समाजाचा राज्य मागासवर्ग आयोगातर्फे अहवाल मागवून शिक्षणामध्ये १२ टक्के व नोकरीमध्ये १३ टक्के आरक्षण दिले होते. मागासवर्गीय अहवालामध्ये मराठा समाजाच्या हलाखीच्या परिस्थितीबद्दल सुस्पष्ट विवेचन दिले आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या सुनावणीत दिलेल्या निर्णयामुळे शांततेत मोर्चा काढणाऱ्यांच्या पदरी नैराश्य आले आहे.मराठा आरक्षणासाठी जवळपास पन्नास जणानी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. सुमारे तेरा हजार मराठा बांधव निरनिराळ्या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.