सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुलींच्या जन्माचे जनतेकडून व प्रशासनाकडून स्वागत होऊ लागले असले तरी आजही जिल्ह्यात मुलींच्या जन्माचे प्रमाण मुलांपेक्षा कमी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर्षी एप्रिलपासून एकूण जन्मलेल्या २ हजार ३६१ नवजात बालकांमध्ये मुलगे १ हजार १९६, तर मुली १ हजार १६५ एवढ्या जन्मलेल्या आहेत. त्यामुळे मुलींच्या संख्येत मुलांपेक्षा ३१ची तफावत निर्माण झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये याबाबत माहितीसाठी लावलेल्या फलकात ‘३१ एवढ्या कळ्या उमलण्याआधीच गेल्या कुठे?’ असा प्रश्न उपस्थित केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा स्वच्छता, शिक्षण, कुटुंब नियोजन यासारख्या सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. मात्र, मुली व मुलगे यांच्यातील समतोल राखण्यात पूर्णपणे यशस्वी ठरलेला नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुलींचे जन्म प्रमाण मुलांपेक्षा कमीच राहिले असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात मुलींच्या जन्माबाबत जनजागृती केली जात आहे. प्रशासन व जनतेकडूनही मुला-मुलींचे स्वागत होऊ लागले आहे.
विविध उपाययोजना, शासकीय योजनेचा लाभ मुलींच्या जन्मानंतर दिले जात आहेत. तरी मुलींच्या जन्माचे प्रमाण मुलांच्या जन्मप्रमाणाशी बरोबरी करू शकले नाही. मात्र, जिल्ह्यातील मुलींचे जन्मदर इतर जिल्ह्यांच्या तुलनेत समाधानकारक राहिले आहे. येथील जनता सुशिक्षित आहे. त्यामुळे आता मुलगाच पाहिजे ही मानसिकता बदलू लागली आहे; परंतु आकडेवारी पाहता जिल्ह्यात स्त्रीभ्रूणहत्या होत नाही, असा दावा करणे चुकीचे ठरू शकेल.कायद्याचा धाक तरीही स्त्रीभ्रूणहत्या प्रश्न गंभीरस्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच कायद्याचा धाक दाखविला जात आहे. तरी जिल्ह्यातील मुलींच्या जन्म प्रमाणातील तफावत पाहता स्त्रीभ्रूणहत्या तर होत नसतील ना? असा प्रश्न कायम राहिला आहे.जिल्ह्यात एप्रिल २०१८ पासून गेल्या पाच महिन्यांत एकूण २३६१ नवजात बालकांचा जन्म झाला. त्यामध्ये मुली ११६५ एवढ्या जन्मलेल्या आहेत. जुलै महिन्यात जन्मलेल्या ५७७ बालकांमध्ये २९४ मुले, तर २८३ मुली जन्माला आल्या आहेत. मुलांपेक्षा ११ मुली कमी जन्मलेल्या आहेत.जिल्हा परिषदेमध्ये स्वागत कक्षासमोरील प्रवेशद्वारावर मुला-मुलींच्या जन्मदराबाबतची नोंद जनहितार्थ प्रसिद्ध करण्यात आली आहे.जन्मदराबाबतची आकडेवारी बघितल्याशिवाय मी या विषयावर अधिक प्रतिक्रिया देऊ शकत नाही. आकडेवारी पाहिल्यानंतर याबाबत बोलू शकेन.-डॉ. महेश खलिपे, जिल्हा आरोग्य अधिकारी, सिंंधुदुर्ग