सावंतवाडीत परिचारकांचा पुतळा जाळलामहीला पदाधिकारी आक्रमक : आमदारकी रद्द करण्याची मागणीसावंतवाडी : देशसेवा करणाऱ्या सैनिकांच्या पत्नींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजपाचे आमदार प्रशांत परिचारक यांचा प्रतिकात्मक पुतळा महीला दिनानिमित्त येथील काँग्रेस कार्यालयासमोर महिला पदाधिकाऱ्यांनी जाळला. यावेळी उपास्थित महीला पदधिकाऱ्यांनी प्रशांत परिचारक यांची आमदारकी रद्द करा, त्यांना विधानभवन प्रवेश बंद करा आदी निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी जळणारा पुतळा महिला पोलिसांनी ताब्यात घेतला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या धामधुमीत आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नींना उद्देशून अवमानकारक भाष्य केले होते. त्या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. दरम्यान, आज महिला दिनानिमित्त जिल्ह्यातील काँगे्रस महिला पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी येथील माजी खासदार नीलेश राणे यांच्या कार्यालयासमोर आमदार परिचारक यांच्या पुतळ्याला काळे फासत चपलाने झोडपले. निषेधाच्या घोषणा देत त्यांची आमदारकी तातडीने रद्द करण्याची मागणी महीला पदाधिकाऱ्यांनी केली. संतप्त महीलांनी परिचारक यांचा पुतळा रॉकेल ओतून पेटविला. प्रतिकात्मक पुतळा जाळत असतानाच याबाबतची कुणकुण सावंतवाडी पोलिसांना लागली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी महिला पोलिस पाठवत काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न करत त्यांच्या हातून पुतळा हिसकावून घेतला. मात्र, यावेळी आक्रमक झालेल्या महिला पदाधिकाऱ्यांनी आमदार परिचारक यांच्या निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या. यामध्ये कॉंग्रेस महिला जिल्हाध्यक्ष प्रणिता पाताडे, जिल्हा परिषद सदस्य रेश्मा सावंत, सावंतवाडी महिला तालुकाध्यक्ष गीता परब, बांदा शहराध्यक्षा चित्रा भिसे, पंचायत समिती सदस्या अक्षया खडपे, नगरसेविका दिपाली भालेकर, पल्लवी रेगे, राखी कळंगुटकर, मोहिनी मडगावकर, नगरसेविका समृद्धी विर्नोडकर, आरती बिरोडकर आदी सहभागी झाल्या होत्या.