बांदा : बसस्थानकावर १ मे पासून येणाऱ्या सर्व एसटी बसेसवर स्टेपनीची सुविधा देण्यात यावी. तशी व्यवस्था नसेल तर त्या बसेस रोखून धरण्यात येतील, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांनी दिला आहे.बऱ्याच गाड्यांचे टायर गुळगुळीत झाले असताना अपघात झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. शहरापासून लांब अंतरावरील गावात बसचा टायर पंक्चर झाल्यास प्रवासी, विद्यार्थी, वाहक, चालक यांना दुसरी स्टेपनी आगारातून आणण्यासाठी त्रास सहन करावा लागतो.
यासाठी प्रत्येक बसवर स्टेपनी द्यावी, अशी मागणी महिनाभरापूर्वी केली होती. मागणी पूर्ण न झाल्यास १ मे रोजी उपोषण करण्याचा इशारा दिला होता. मात्र त्यावेळी एसटीचे अधिकारी शकील सय्यद व एस. कामटे यांनी आंदोलन करू नका असे आवाहन केले आहे.स्टेपनी घेतल्याशिवाय आगारातून गाडी बाहेर काढू नये अशा लेखी सूचना दिल्या आहेत. १ तारखेनंतर स्टेपनी नसलेली बस येथे आल्यास त्या गाड्या रोखून धरू, असा इशारा देण्यात आला आहे.