देवगड : देवगडच्या कचरा प्रश्नावरून आक्रमक झालेल्या शिवसेनेने कचरा टाकत असलेल्या ठिकाणी ठिय्या आंदोलन छेडले. जोपर्यंत कचरा उचलत नाही तोपर्यंत उठणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे यांनी तत्काळ कचरा उचलण्याची कार्यवाही करतो, असे आश्वासन दिले.देवगड जामसंडे नगरपंचायतीच्यावतीने गोळा करण्यात येत असलेला कचरा पवनचक्कीनजीक समुद्रकिनारी टाकण्यात येत असल्याने या परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले. यावरून शिवसेना, भाजपा नगरसेविका हर्षा ठाकूर व देवगडमधील सामाजिक कार्यकर्ते यांनी कचरा टाकत असलेल्या ठिकाणी जात ठिय्या आंदोलन छेडले.गुरुवारी सकाळी शिवसेना तालुकाप्रमुख मिलिंद साटम, अॅड. प्रसाद करंदीकर, नगरसेविका हर्षा ठाकूर, शिवप्रसाद पेडणेकर, राजू पाटील, आशिष लोके, दीपक घाडी आदींनी नगरपंचायत कचरा टाकत असलेल्या ठिकाणाला भेट दिली. यावेळी टाकण्यात आलेला कचरा पवनचक्की परिसरात सर्वत्र पसरलेला होता.यावेळी मुख्याधिकारी गव्हाणे यांनी या परिसरात नगरपंचयतीमार्फत कचरा टाकला जात आहे याबद्दल आपल्याला माहिती नाही, असे सांगितल्याने आंदोलनकर्त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. गव्हाणे यांनी कर्मचाऱ्यांनाही तत्काळ कचरा उचलून परिसर स्वच्छ करावा अशा सूचना दिल्या.
पवनचक्की परिसरातील जागा महावितरणची असल्याने उपअभियंता जयकुमार कथले यांनाही बोलाविण्यात आले. त्यांनीही याबाबत वरिष्ठांना कळविणार असल्याचे सांगितले.आंदोलनकर्त्यांनी नगरपंचायत कारभाराविरोधात हातात फलक घेत घोषणाबाजी केली व त्या परिसरातच ठिय्या आंदोलन छेडले.मुख्याधिकारी धारेवरनगरपंचायत नागरिकांकडून ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे घेते. प्रत्यक्षात हाच कचरा एकाच ठिकाणी टाकून दुर्गंधी पसरविण्याचे काम करीत आहे, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. कचरा टाकत असतानाच नगपंचायत गाडीला रंगेहाथ पकडून कचरा टाकण्यापासून त्यांनी रोखले. तसेच मुख्याधिकाऱ्यांना बोलावून घेत धारेवर धरले.