ओटवणे , दि . २३ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओटवणे बँक आॅफ इंडियाच्या शाखेत चोरी करण्याचा धाडसी प्रयत्न अज्ञात चोरट्याकडून करण्यात आला. पण बँकेच्या आतमधील पैशांच्या कपाटाचे कुलूप न तुटल्याने चोरट्याला पैशांवर डल्ला मारता आला नाही.
बँकेतील दुसऱ्या बाजूच्या ग्रीलचे कुलूप तोडून चोरट्याने तिथे चोरी करण्याचा केलेला प्रयत्नही निष्फळ ठरला. त्यामुळे त्याला हात हलवत परतावे लागले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेजही तपासले. पण चोरट्याचा माग लागला नाही.
गुरूवारी व शुक्रवारी शासकीय सुटी असल्याने त्याचा फायदा घेत शुक्रवारी मध्यरात्री बँकेत चोरीचा प्रयत्न झाल्याचे तपासात पुढे आले. चोरट्याने मोठा दांडा व लोखंडी सळीने खिडकीवरील ग्रील काढले व आतमध्ये प्रवेश केला. आतमधील खोलीचे ग्रील व कुलूप तोडण्यात त्याला यश आले. मात्र, कॅशियरच्या खोलीचे कुलूप न तुटल्याने त्याच्या हाती काहीच लागले नाही.
दरम्यान, शनिवारी पहाटे बँक कर्मचारी सुधाकर बुराण, सचिन कुकडे यांनी बँकेत प्रवेश केल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर तत्काळ पोलीस पाटील लक्ष्मण गावकर यांना पाचारण करण्यात आले. शुक्रवारी रात्री बँकेत चोरीच्या केलेल्या प्रयत्नात काहीच न मिळाल्याने चोरट्याने बँकेच्या नजीक असलेल्या अर्जुन देवळी यांच्या घराच्या आवारात ठेवलेली सायकल लांबविली.
सावंतवाडी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरट्याची पुसटशी सावली दिसून आली. श्वानपथकातील श्वानही नदीकिनाऱ्यापर्यंत जाऊन घुटमळला.
याबाबतचा अधिक तपास सावंतवाडी पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनायक नाईक, विलास नर, दीपक सुतार, ए. एस. जाधव आदी करीत आहेत.
बँकेची सुरक्षा राम भरोसेओटवणेसारख्या ग्रामीण भागात राष्ट्रीयकृत बँकेने पाय रोवले. मात्र, सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना तसेच व्यवस्थापन बँकेकडे नाही. बँकेच्या एटीएम केंद्राकडे सुरक्षा रक्षक आहे. पण बँकेवर लक्ष ठेवण्यासाठी मात्र सुरक्षारक्षक नाही. बँकेच्या या ह्यराम भरोसेह्ण कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
ओटवणे बँक चोरी प्रकरणाची घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पाहणी केली.