कणकवली : कणकवली तालुक्यातील वागदे येथे शस्त्रांसह पकडण्यात आलेल्या प्रकाश विनायक पाटील (३८, रा. गोवा) या चोरट्याने बेळगावसह कर्नाटक राज्यात विविध ठिकाणी घरफोडी करून चोरून आणलेले सोने कणकवलीतील दोन सुवर्ण पेढ्यांवर विकले होते. अशी माहिती त्याने बेळगावपोलिसांना दिली होती. त्यावरून पोलिस उपनिरीक्षक किरण होणाकट्टी यांच्यासह बेळगाव पोलिसांचे पथक गुरुवारी कणकवलीत दाखल झाले. त्या आरोपीने दिलेल्या माहितीनुसार एका सुवर्णकारांसह सोने वितळविणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, या अचानक झालेल्या कारवाईमुळे शहरातील सुवर्णकार तसेच व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला.दरम्यान, बेळगाव पोलिसांनी त्या सुवर्णकारासह सोने वितळविण्याचे काम करणाऱ्या त्या व्यक्तीला चौकशीसाठी तसेच त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी शुक्रवारी बेळगाव पोलिस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस दिली आहे. कर्नाटक पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने सुवर्णकारांवर कारवाई केली, असे सांगत गुरुवारी दुपारी सुवर्णकार संघटना पदाधिकारी तसेच भाजप पदाधिकाऱ्यांनी कणकवली पोलिस ठाणे गाठले. त्यामुळे पोलिस ठाण्यात मोठी गर्दी झाली होती. या घटनेमुळे कणकवलीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. चोरीप्रकरणी लांजा पोलिसांनी प्रकाश पाटील याला ताब्यात घेतले होते. तेथून बेळगाव पोलिसांनी पाटील याला ताब्यात घेतल्यानंतर चोरी केलेले सोने आपण कणकवलीतील दोन सुवर्ण पेढ्यावर विकले असल्याची कबुली त्याने दिली. त्यामुळे अधिक चौकशीकरिता गुरुवारी सकाळी बेळगाव पोलिस कणकवलीत दाखल झाले.शहरातील परमहंस भालचंद्र महाराज आश्रमात संबधित सुवर्णकार आरती करण्याकरता थांबलेले असताना संशयीत आरोपीने दिलेल्या माहितीनुसार संबंधित सुवर्णकाराला बेळगाव पोलिसांनी थेट आरोपी सारखी वागणूक देत ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. असा आरोप सुवर्णकाराने केला. दरम्यान त्या सुवर्णकाराला घेऊन कर्नाटक पोलिस कणकवली पोलिस ठाण्यामध्ये दाखल झाले. यावेळी कणकवलीतील सुवर्णकार संघटना पदाधिकारी तसेच माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्यासह कणकवलीतील अनेक नागरिकांनी पोलिस ठाण्यामध्ये धाव घेतली.चोरट्याच्या फक्त सांगण्यावरून सुवर्ण पेढी व्यापाऱ्यांना त्रास देऊ नका. तपासात निष्पन्न झाल्यास कारवाई करा. चोरटा सांगतो म्हणून धरपकड करून व्यापाऱ्यांची बदनामी करू नका, अशा प्रकारचे म्हणणे व्यापारी संघटना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांसमोर मांडले. आरोपी सांगत असलेल्या सराफी व्यापाऱ्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी वेळ देऊ, त्यांनी आपले लेखी म्हणणे मांडावे, त्यांना अटक केली जाणार नाही, असे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर कणकवली पोलिस ठाण्यात निर्माण झालेले तणावपूर्ण वातावरण निवळले. त्यानंतर त्या सुवर्णकारासह सोने वितळविणाऱ्या कारागिरास त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी तसेच अधिक चौकशीसाठी बेळगाव पोलिस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस देण्यात आली आहे. असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या घटनेची चर्चा कणकवलीसह जिल्ह्यात रंगली होती.
चोरीचे सोने घेतले, कणकवलीतील सुवर्णकारासह अन्य एकाला बेळगाव पोलिसांची नोटीस
By सुधीर राणे | Published: July 28, 2023 3:47 PM