सावंतवाडी : शिवसेनेचे काही आमदार फुटून शिंदे गटात सामील झाल्याने या बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवर घरांवर शिवसैनिकांनी आंदोलन केले तसेच घर व कार्यालयावर दगडफेक करण्याचे प्रकार सुरू असून, शनिवारी सायंकाळी उशिरा सावंतवाडीतील आमदार दिपक केसरकर यांच्या कार्यालयावर एकाने दगडफेक करत जोरदार घोषणाबाजी केली त्याला लागलीच पोलिसांनी ताब्यात घेतले असून उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू आहे.या घटनेनंतर सावंतवाडी शहरातील पोलीस बंदोबस्त ही वाढविण्यात आला आहे.
आमदार दीपक केसरकर हे दोन दिवसापूर्वी शिंदे गटात सामील झाले असून त्यांना शनिवारी शिंदे गटाचा अधिकृत प्रवक्ता म्हणून नेमण्यात आले आहे. केसरकर हे दिवसभर वेगवेगळ्या चॅनल्स ना मुलाखत देत असतनाच शिंदे गटाची बाजू ही ठामपणे माडत आहेत. अशातच सायंकाळी साडेसहा ते सात वाजण्याच्या दरम्यान केसरकर यांच्या श्रीधर कार्यालयावर एका व्यक्तीने चाल करत जात काचेवर दगड मारला तसेच जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेना आगे बढो हम तुम्हारे साथ है अशाप्रकारच्या घोषणा दिल्या. या अचानक झालेल्या हल्ल्याने पोलीसही चांगलेच चक्रावून गेले त्यांनी लागलीच धावाधाव करत त्या कार्यकर्त्याला ताब्यात घेतले या कार्यकर्त्याने मद्यप्राशन केले होते.असे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी सांगितले.
संबंधित कार्यकर्ता हा कणकवलीतील असून त्याची अधिक चौकशी आम्ही करीत आहोत.त्याला कोणी पाठवले तसेच तो कणकवली तून इथपर्यंत कसा आला यांचीही चौकशी करण्यात येणार आहे असे पोलीसांकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान पोलिसांकडून विशेष खबरदारी घेत केसरकर यांच्या निवासस्थानी दोन दिवसापूर्वीच राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या.तसेच सावंतवाडी शहरातूनही पोलिस संचलन करण्यात आले होते. मात्र आज हल्ल्यावेळी तेथे पोलीस बंदोबस्त असल्याने मोठा अनर्थ टळला या घटनेनंतर सावंतवाडी शहरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.