दापोली : एलईडी मच्छिमारीचा वाद विकोपाला गेला असताना पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मंगळवारी शिष्टमंडळासह केंद्रीय मंत्री राजनाथसिंह यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन चर्चा केली. यावेळी एलईडीद्वारे होणारी मासेमारी थांबविण्याचे आदेश राजनाथसिंह यांनी दिल्याची माहिती रामदास कदम यांनी दिली.
कोकण किनारपट्टीवर पारंपरिक मच्छिमार विरुद्ध तांत्रिक मच्छिमार असा वाद पेटला आहे. एलईडीद्वारे होणाऱ्या मासेमारीमुळे समुद्रातील मत्स्य साठे संपुष्टात येऊ लागल्याने पारंपरिक मच्छिमार बांधवांवर उपासमारीची वेळ येत आहे. ही मासेमारी बंद करण्याची मागणी करूनसुद्धा शासन दुर्लक्ष करत होते. त्यामुळे संतप्त मच्छिमार बांधवांनी चक्क लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.
याबाबत दापोली, मंडणगड, गुहागर मच्छिमार संघर्ष समिती, हर्णै बंदर येथील शिष्टमंडळाने मंगळवारी सकाळी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची नवी दिल्ली येथे बेकायदेशीर फिशिंग करणाऱ्या नौकांवर कारवाई करण्याबाबत भेट घेतली. गृहमंत्री यांनी संबंधित फिशरीज खाते व संरक्षण मंत्रालयातील अधिकारी यांना याबाबत ताबडतोब सूचना दिल्या आहेत. तसेच दुपारी संरक्षणमंत्री सीतारमन यांची भेट घेण्यात आली.
या शिष्टमंडळासोबत राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम, खासदार राजकुमार धूत, भांडूपचे आमदार अशोक पाटील, योगेश कदम, पी. एन. चौगुले, कलंदर शेखनाग, गोपीचंद चोगले, महेंद्र चोगले, विष्णू तबीब, असलम खान हे मच्छिमार संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. गृहमंत्री यांनी नौकांवर ताबडतोब कारवाई करण्याचा सूचना दिल्यामुळे मच्छिमार बांधव निवडणुकीवरील बहिष्कार मागे घेतात का? हेच पाहायचे आहे.